आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारांची - भारत आणि इंग्लंडदरम्यान येथे शनिवारी होणा-या तिस-या वनडे क्रिकेट सामन्यासाठी टीम इंडियाने आज कसून सराव केला. मात्र, विरोधी इंग्लंड टीमने सरावाऐवजी विश्रांतीला प्राधान्य दिले. पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ सध्या 1-1 ने बरोबरीत आहेत.
इंग्लंडने हॉटेलमध्ये वेळ घालवला
इंग्लिश टीमच्या सरावाची वेळ सकाळी 11 वाजेची होती. मात्र, त्यांनी हॉटेलातच विश्रांती घेतली. दुसरीकडे टीम इंडियाने सायंकाळी कसून सराव केला. दोन्ही संघ शुक्रवारीसुद्धा सराव करतील. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या शहरात होत असलेल्या या सामन्यासाठी स्थानिक क्रिकेट चाहत्यांत जबरदस्त उत्साह आहे. 40 हजार प्रेक्षक संख्या असलेल्या या स्टेडियमवर होणा-या लढतीची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. बुधवारी संपूर्ण टीम इंडियाने कर्णधार धोनीच्या घरी जेवणाचा आनंद लुटला.
धोनीला मिळणार आवडती खेळपट्टी ?
घरच्या मैदानावर खेळणा-या महेंद्रसिंग धोनीला रांचीत तरी त्याच्या मनासारखी खेळपट्टी मिळेल काय, या एका प्रश्नामुळे तमाम चाहते उत्सुक आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार खेळपट्टीवर गवत ठेवले जाणार नाही. या खेळपट्टीवर सामना जसजसा पुढे वाढेल तसतशी फिरकीपटूंना अधिक मदत मिळेल, असा अंदाज आहे.
वनडे क्रिकेटमध्ये इंग्रजांविरुद्ध आता 45 व्या विजयाची प्रतीक्षा
कसोटी मालिकेत भारताचा पराभव झाला असला तरीही वनडेत टीम इंडियाची बाजू उजवी असल्याचे दिसत आहे. भारत आणि इंग्लंडदरम्यान आतापर्यंत 83 वनडे सामने झाले आहेत. यात भारताने 44 मध्ये विजयश्री मिळवली. दुसरीकडे इंग्लंडला केवळ 34 सामनेच जिंकता आले. दोन सामने टाय झाले, तर तीन सामन्यांचा निकाल लागला नाही. भारतीय मैदानांवर दोन्ही देशांत आतापर्यंत 42 वनडे झाले. यात टीम इंडियाने 27 मध्ये विजय मिळवला, तर 14 सामने भारताने गमावले. एक सामना (वर्ल्डकप 2011) टाय झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.