आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी, ही आहे कोहलीची \'विराट\' रणनिती!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे  - आयसीसी कसोटी क्रमवारीत नंबर वन टीम इंडिया आणि दुसऱ्या क्रमांकाची टीम ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरुवारपासून बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटीला सुरुवात होत आहे. पुण्यात प्रथमच टीम इंडिया कसोटी सामना खेळेल. पुण्यात याआधी दोन टी-२० सामने झाले आहेत. 
  
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १९४७ पासून ९० कसोटी सामने झाले असून, यात भारताने २४ विजय मिळवताना ४० मध्ये पराभव स्वीकारला. एक सामना टाय झाला तर २५ सामने ड्रॉ झाले. भारताने पुण्याची कसोटी जिंकली तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचा हा २५ वा विजय ठरेल. दुसरीकडे विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया मागच्या १९ कसोटींपासून अपराजित आहे, तर पाहुण्या ऑस्ट्रेलियाला मागच्या १२ वर्षांपासून भारतात विजयाची प्रतीक्षा आहे. भारतीय टीम आपल्या घरच्या मैदानावर सलग चौथी मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानावर उतरेल.  
  
सातव्या मालिका विजयाचे प्रयत्न 

कोहली ब्रिगेडने सलग सहा कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. कोहलीच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत एकही मालिका गमावलेली नाही. भारताने कोहलीच्या नेतृत्वात श्रीलंकेला २-१ ने, द. आफ्रिकेला ३-० ने, वेस्ट इंडीजला २-० ने, न्यूझीलंडला ३-० ने, इंग्लंडला ४-०  ने तर बांगलादेशला १-० ने हरवले. यात श्रीलंका आणि वेस्ट इंडीजला भारताने त्यांच्या घरात हरवले. ऑस्ट्रेलियाने मागच्या चार मालिकांपैकी दोनमध्ये विजय मिळवला.  
 
सचिनचा विक्रम मोडण्याची कोहलीला संधी
चार कसोटी मालिकांत सलग चार द्विशतके ठोकण्याचा पराक्रम कोहलीने केला आहे. कोहलीने मागच्या १२ सामन्यांत ६ शतके ठोकून १२७६ धावा काढल्या आहेत. या मालिकेत कोहलीकडे क्रमवारीत सर्वाधिक रेटिंग गुणाचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची संधी असेल. कोहलीच्या नावे सध्या ८९५ रेटिंग गुण आहेत. सचिन तेंडुलकरच्या नावे ८९८ रेटिंग गुण होते. सचिनच्या विक्रमापासून कोहली केवळ ३ गुणांनी मागे आहे. कोहली सध्या शानदार फॉर्मात असून, तो ९०० रेटिंग गुणांचा टप्पा गाठू शकतो. असे झाले तर ९०० रेटिंग गुण मिळवणारा सुनील गावसकर (९१६)यांच्यानंतर दुसरा फलंदाज ठरेल. 
 
बॉर्डर-गावसकर ६ वेळा भारताच्या नावे 
१९९६ पासून दोन्ही देशांत आतापर्यंत १२ बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका झाल्या आहेत. यात भारताने ६, तर ऑस्ट्रेलियाने ५ मालिका जिंकल्या आहेत. एक मालिका ड्रॉ झाली होती. अखेरची मालिका २०१४-१५ मध्ये आॅस्ट्रेलियात झाली. भारताने ती मालिका २-० ने गमावली होती.

कांगारूंनी ७ कसोटी मालिका गमावल्या
अॉस्ट्रेलियाने भारतात १३ कसोटी मालिका खेळल्या असून, यामध्ये ७ मालिकांत त्यांचा पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने भारतात आतापर्यंत ४६ कसोटी सामने खेळले आहेत. यात टीम इंडियाने १९ तर ऑस्ट्रेलियाने १२ सामने जिंकले आहेत. १४ सामने ड्रॉ आणि एक सामना टाय झाला आहे.
 
अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत १० कसोटी खेळताना ५० गडी बाद केले आहेत. यात त्याने चार वेळा ५ विकेट तर एकदा १० गडी बाद केले. जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अातापर्यंत केवळ ४ सामने खेळताना २४ गडी बाद केले आहेत. ऑफस्पिनर अश्विनने मागच्या १३ सामन्यांत ७८ गडी बाद केले आहेत, तर जडेजाने मागच्या १० कसोटींत ४९ विकेट घेतल्या.
२० कसोटी भारताने मागच्या चार वर्षांत भारतात खेळल्या. यात १७ विजय, ३ ड्रॉ.
१० कसोटी ऑस्ट्रेलियाने मागच्या १० वर्षांत खेळल्या. ८ पराभव, २ ड्रॉ.  
१३ बळी घेताच भारतीय भूमीवर रविचंद्रन अश्विनच्या कसोटीत २०० विकेट पूर्ण होतील.
 
दोन्ही संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, करुण नायर, वृद्धिमान साहा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, जयंत यादव, उमेश यादव, ईशांत शर्मा, भुवनेश्वर, कुलदीप यादव, अभिनव मुकुंद, हार्दिक पंड्या. 
 
ऑस्ट्रेलिया : स्टिवन स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, अॅश्टन एगर, जॅकसन बर्ड, पीटर हँडसकोंब, जोश हेझलवूड, उस्मान ख्वाजा, नॅथन लॉयन, मिशेल मार्श, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टिव ओकिफे, मॅथ्यू रेनशॉ, मिशेल स्टार्क, मिशेल स्वीपसन, मॅथ्यू वेड.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, टीम इंडियाच्या प्रॅक्टिस सेशनचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...