आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आफ्रिकेत टीम इंडियाचा आज पहिला पेपर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोहान्सबर्ग - चालू हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये असणारी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्षातील शेवटची मालिका खेळणार आहे. याची सुरुवात आजपासून होणार असून तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना आज जोहान्सबर्गमध्ये खेळला जाणार आहे. सलग सहा एकदिवसीय मालिका जिंकल्याच्या आत्मविश्वासासह टीम इंडिया येथे आली असून नुकतीच संपलेल्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला आहे.
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत एकही मालिका जिंकली नाही. मागच्या दौ-यात टीम इंडियाला एकदिवसीय मालिकेत 2-3 असा पराभव स्वीकारावा लागला होता. परंतु या वेळी भारतीय संघात युवा खेळाडूंचा भरणा असून सर्वच खेळाडू लयीत आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे आव्हान परतून लावण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे.
मधल्या फळीत मातब्बर
मधल्या फळीतही मातब्बर खेळाडूंचा भरणा आहे. धडाकेबाज युवराजसिंग आणि सुरेश रैना यांच्यासोबतच कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी याच्यावर मध्यक्रमाची जबाबदारी आहे. सोबतच रवींद्र जडेजाचे अष्टपैलुत्वही या वेळी कामी पडू शकते. युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या टीम इंडियात युवराजसिंग आणि महेंद्रसिंग धोनीच सर्वाधिक अनुभवी आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा सामना करणे किती कठीण आहे हे या दोघांना चांगल्या प्रकारे माहीत आहे.
नव्या त्रिमूर्तीवर टीम इंडियाची मदार
इंडियन प्रीमियर लीगमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांविरुद्ध खेळल्याचा फायदा येथे होऊ शकतो असे टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सलामीवीर शिखर धवन यांनी म्हटले आहे. रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली यंदा उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. चालू हंगामात त्यांनी खो-याने धावा ओढल्या आहेत. फलंदाजीची संपूर्ण मदार या नव्या त्रिकुटावर राहणार आहे.
संभाव्य संघ
भारत - शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, युवराजसिंग, सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, आर.अश्विन, भुवनेश्वरकुमार, मोहंमद शमी, ईशांत शर्मा किंवा उमेश यादव.
दक्षिण आफ्रिका - ग्रीम स्मिथ, हाशिम आमला, क्वुडी कॉक, जॅक कॅलिस, एबी डिव्हिलियर्स (कर्णधार), जेपी ड्युमिनी, डेव्हिड मिलर, वर्नोन फिलेंडर, डेल स्टेन, एम. मोर्केल, इम्रान ताहीर, आर. मॅक्लारेन.
उसळत्या खेळपट्टीवर सामना
वाँडरर्सच्या वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर भारत तीन वेगवान आणि एका फिरकीपटूसह मैदानात उतरू शकतो. टीम इंडियाकडून अश्विननंतर भुवनेश्वरकुमार आणि मोहंमद शमीसोबत तिस-या वेगवान गोलंदाजाच्या रूपात मोहित शर्मा, ईशांत शर्मा किंवा उमेश यादव यांच्यापैकी कुणा एकाची वर्णी लागू शकते.
वेगवान गोलंदाजीचे अस्त्र
सशक्त वेगवान गोलंदाजी ही आफ्रिकेची ताकद आहे. जगातील अव्वल गोलंदाज स्टेनसोबतच मोर्ने मोर्केल आणि फिलेंडर हे त्रिकूट वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकते. पाकविरुद्धच्या मालिकेत स्टेनने उत्कृष्ट गोलंदाजी करत दोन सामन्यांत 9 विकेट मिळवल्या होत्या.