आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाची जोरदार मुसंडी !,दुस-या डावात 1 बाद 87 धावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑकलंड - टीम इंडियाने पहिल्या कसोटीच्या तिस-या दिवशी जबरदस्त कामगिरी केली. सुरुवातीला भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करताना न्यूझीलंडला दुस-या डावात अवघ्या 105 धावांत गुंडाळले. यानंतर भारतीय फलंदाजांनी शानदार फलंदाजी करून एक बाद 87 धावा काढल्या. ईडन पार्कच्या वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर भारतीय खेळाडूंनी साहसी प्रदर्शन करून विजयाची आशा निर्माण केली आहे. सलामीवीर शिखर धवनने मागच्या अपयशाला मागे टाकत नाबाद 49, तर चेतेश्वर पुजाराने नाबाद 22 धावा काढल्या. सामन्याचा चौथा दिवस निर्णायक असेल. भारताला विजयासाठी 407 धावांचे लक्ष्य मिळाले. भारताला विजयासाठी अजून 320 धावांची गरज आहे.
वेगवान गोलंदाज ईशांत (3 विकेट), मो. शमी (3 विकेट) आणि जहीर खान (2 विकेट) यांनी टिच्चून गोलंदाजी करताना न्यूझीलंडचा धुव्वा उडवला. याच न्यूझीलंडने पहिल्या डावात 500 धावांचा डोंगर उभा केला होता. जागतिक क्रिकेटमध्ये अशा घटना खूप कमी वेळेस घडतात. दुस-या डावात न्यूझीलंडचा निम्मा संघ 25 धावांत तंबूत परतला होता. यानंतर रॉस टेलरने (41) खिंड लढवली.
202 धावांत भारताचा डाव आटोपला
तत्पूर्वी सकाळी न्यूझीलंडने भारताचा पहिला डाव जेवणाच्या वेळेपूर्वी 60 षटकांत 202 धावांत गुंडाळला. भारताने सकाळी 4 बाद 130 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्या वेळी रोहित शर्मा 67, तर अजिंक्य रहाणे 23 धावांवर खेळत होते.
नील वॅग्नरच्या 4 विकेट
धोनी (10), जहीर (14), ईशांत (0) आणि मो. शमी (2) लवकर बाद झाले. न्यूझीलंडच्या गोलदांजीपुढे भारतीय संघ दबावात होता. भारताचा डाव अवघ्या 202 धावांत आटोपला. नील वॅग्नरने 64 धावा देत 4 विकेट घेतल्या. ट्रेंट बोल्टने व टीम साउथीने प्रत्येकी तीन गडी बाद केले.
...तर भारताचा ऐतिहासिक विजय ठरेल!
विजयासाठी मिळालेले 407 धावांचे लक्ष्य यशस्वीरीत्या गाठल्यास भारतीय संघ रविवारी ऐतिहासिक विजयाची नोंद करू शकेल. हा टीम इंडियाचा सर्वात मोठा विजय ठरेल. तब्बल 38 वर्षांपूर्वी भारताने वेस्ट इंडीजविरुद्ध सामन्यात 406 धावांचे लक्ष्य गाठून विजय मिळवला होता.