आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामियामी - दोन वेळेसचा गतविजेता सर्बियाच्या नोवाक योकोविकला मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. याच वेळी मागच्या वर्षीचा उपविजेता अँडी मुरेने सहजपणे उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
जागतिक क्रमवारीतील नंबर वन योकोविकला जर्मनीचा 15 वा मानांकित टॉमी हॅसने 6-2, 6-4 ने हरवले. मात्र, यूएस ओपन चॅम्पियन अँडी मुरेला इटलीचा खेळाडू आंद्रेस सेप्पीला पराभूत करण्यासाठी विशेष परिश्रम घ्यावे लागले नाहीत. या सत्रात योकोविकचा हा फक्त दुसरा पराभव ठरला आहे. हॅसविरुद्ध तो मुळीच लयीत दिसला नाही. दुसरीकडे हॅसने अत्यंत कलात्मक खेळ करून योकोविकला स्पर्धेबाहेर केले.
मला कोर्टवर बरे वाटत नव्हते. येथे खेळण्यासाठी परिस्थितीही अनुकूल नव्हती. चेंडूलासुद्धा अपेक्षेनुसार उसळी मिळत नव्हती. यामुळे फटके खेळताना वारंवार अडचण येत होती, अशी प्रतिक्रिया पराभवानंतर सर्बियाच्या योकोविकने व्यक्त केली.
हॅसच्या आक्रमक खेळाने प्रेक्षक खुश
पुढच्या आठवड्यात वयाची 35 वर्षे पूर्ण करणा-या टॉमी हॅसने जिगरबाज आणि आक्रमक खेळ करून योकोविकला नमवले. त्याच्या या नेत्रदीपक खेळाला प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली. अंतिम आठमध्ये प्रवेश केल्यानंतर हॅसचा पुढचा सामना फ्रान्सच्या जाईल्स सिमोन याच्याशी होईल. सिमानने चौथ्या फेरीत सर्बियाच्या जांको टिप्सारेविचला 5-7, 6-2, 6-2 ने हरवत पुढच्या फेरीत प्रवेश केला. हॅसने सामन्यात सात फोरहँड विनर्स मारताना फर्स्ट सर्व्हिस पॉइंटमध्ये तब्बल 76 गुण जिंकले. हॅसच्या तुफानापुढे मागच्या 14 सामन्यांत योकोविकची विजयी घोडदौड थांबली. पहिला सेट सहज जिंकल्यानंतर हॅसने फोरहँड विनर मारून दुस-या मॅच पॉइंटवर त्याने 80 मिनिटांत योकोविकचा खेळ खल्लास केला.
सानिया-बेथानीचा पराभव
भारताची सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार अमेरिकेची बेथानी माटेक सँड्स यांना सोनी ओपन मियामी मास्टर्स स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. या दोघींना महिला दुहेरीतील सारा इराणी आणि रॉबर्टो विन्सी यांनी सरळ दोन सेटमध्ये 1-6, 4-6 ने हरवले.
सेरेना, रंदावांस्का विजयी
महिला गटात जागतिक क्रमवारीतील नंबर वन सेरेना विल्यम्सने चीनची पाचवी मानांकित ली नाला 6-3, 7-6 (7-5) ने हरवले. या विजयासह तिने उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता तिचा सामना पोलंडची चौथी मानांकित खेळाडू एग्निजस्का रंदावांस्काशी होईल.
योकोविकला चुका नडल्या
येथे तीन वेळा विजेतेपद (2007, 2011, 2012) पटकावणा-या योकोविकला चौथ्या फेरीत स्वत:च्याच चुका नडल्या. त्याने एक डबल फॉल्ट केला आणि सेकंड सर्व्ह पॉइंटवर फक्त 54 गुण मिळवले. 1999 नंतर प्रथमच हॅसने जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडूला मात दिली आहे.
हॅसने उत्तम खेळ केला
‘असे काही दिवस असतात, ज्या वेळी कोर्टवर तुमचे मन रमत नाही. आजचा दिवस माझ्यासाठी असाच होता. सर्व श्रेय हॅसला जाते. त्याने माझ्या तोडीला उत्तम खेळ केला. माझ्या दृष्टीने ही आतापर्यंतची माझी सर्वाधिक वाईट कामगिरी ठरली.’
नोवाक योकोविक, पराभवानंतर.
फेरर, मेल्जरची आगेकूच
स्पेनचा तिसरा मानांकित डेव्हिड फेररने जपानच्या की निशिकोरीला 6-4, 6-2 ने नमवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. आता त्याचा पुढचा सामना ऑस्ट्रियाच्या जुरगन
मेल्जरशी होईल. मेल्जरने
स्पेनच्या अल्बर्ट रामोसला 2-6, 6-3, 6-3 ने हरवले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.