सोलापूर - बोलता येत नाही आणि ऐकताही. ‘ओव्हरहेड स्मॅश, ड्राइव्ह कसा मारायचा, व्हॉलीजकडे कसे लक्ष द्यायचे,’ अशी ती बोलते आणि ऐकते ते फक्त तिच्या रॅकेट आणि चेंडूशी. २०१७ मध्ये टर्की येथे होणारी मूकबधिरांची ऑलिम्पिक स्पर्धा हे लक्ष्य. पदके तिला साद घालताहेत. कर्नूलची (आंध्र प्रदेश) मूकबधिर लॉन टेनिसपटू जाफरीन शेखची युवा खेळाडूंना प्राेत्साहित करणारी ही कहाणी...
सोलापुरात सोमवारी जामश्री पुरस्कृत (दि. १९) महिलांची राष्ट्रीय मानांकन स्पर्धा सुरू होत आहे. मानांकित खेळाडूंबरोबर खेळण्यासाठी स्पर्धेत प्रवेश मिळावा म्हणून ती सोलापुरात आली. २०१५ पासून महिला गटात खेळण्यास तिने सुरुवात केली आहे. सोलापुरातली तिची ही दुसरीच स्पर्धा. मुंबईच्या इशिका यादवला ९-६ व सांगलीच्या प्रतीक्षा बावडेकरला ६-१, ७-५ असे हरवत जाफरीनने मुख्य स्पर्धेत प्रवेश केला.
जाफरीनच्या कामगिरीचा आलेख
जाफरीनची भाषा तिच्या वडिलांना शब्द न् शब्द समजते. त्यांनी सांगितले की, ‘मूकबधिरांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तिची घोडदौड २०१३ पासून सुरू झाली. सध्या महिला गटात अव्वल असलेल्या जाफरीनने जुलै २०१३ मध्ये बल्गेरियातील ऑलिम्पिक स्पर्धेत चौथे स्थान मिळवले. जर्मनीत मे २०१४ मध्ये झालेल्या यूथ टेनिस स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. जुलै २०१४ मध्ये अमेरिकेतील जागितक स्पर्धेत जपान व चीनच्या खेळाडूंना हरवून जाफरीन उपांत्यपूर्व फेरीत धडकली. आता तिचे लक्ष्य आहे २०१७ मध्ये टर्की येथे होणा-या ऑलिम्पिक स्पर्धेकडे. हैदराबादच्या टेनिसपटू
सानिया मिर्झा अकादमीत ती कसून सराव करत आहे.’
टेनिस खेळायला सुरूवात केल्यापासून हळुहळू बोलण्याचा प्रयत्न करते. तिचे हे बोलणे फक्त आम्हांलाच कळते, असे तिच्या वडीलांनी सांगितले.
शासनाचे दुर्लक्ष, पण सानियाचा हात
जाफरीनला तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे म्हणून वडिलांनी हैदराबाद गाठले. जुलै २०१३ मध्ये आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांना भेटून आर्थिक मदतीची मागणी केली. माध्यमांनीही तेव्हा जाफरीनची व्यथा मांडली होती. अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झाला तिची व्यथा जाणली. सानियाने तिच्या वडिलांशी संपर्क साधून अकादमीत नि:शुल्क प्रवेश दिला.