आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'The Great Khali' Hints At Introducing Wrestling In Dehradun

खलीच्या कुस्तीचा थरार डेहराडूनमध्ये रंगणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - भारतातही मनोरंजक कुस्ती लोकप्रिय व्हावी या उद्देशाने महाकाय योद्धा द ग्रेट खलीने दिलेला शब्द तो पाळणार असून जून महिन्यात महाबलीच्या पहिल्या कुस्ती शोचा थरार डेहराडूनमध्ये बघायला मिळणार आहे. यानिमित्ताने भारतीय कुस्तीप्रेमींना प्रथमच डब्ल्यूडब्ल्यूईच्या १२ पुरुष व चार महिला कुस्तीपटूंची रोमांचक झुंज प्रत्यक्ष बघायला मिळू शकेल.

या शोसाठी उत्तराखंड सरकारचे सहकार्य मिळणार असून उर्वरित काम मी पूर्ण करणार आहे, अशी माहिती खलीने बुधवारी अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी दैनिक भास्कर समूहाशी बोलताना दिली. डेहराडूननंतर हल्दानी येथे दुसर्‍या शोचे आयोजन केले जाणार आहे.

गेल्या महिन्यात खलीने उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांची भेट घेतली. त्या वेळीच या शोसाठी सरकार खलीला संपूर्ण सहकार्य करणार यावर शिक्कामोर्तब झाले. मात्र, या दोन्ही शोसाठी तिकीट ठेवणार की नाही यावर अद्याप निर्णय झाला नाही. लढतींचे ठिकाण व तारीखही मे महिन्यात निश्चित केली जाणार आहे. ज्या ठिकाणी एकाच वेळी १० हजार प्रेक्षक कुस्तीचा आनंद घेऊ शकतील अशा स्टेडियमवर शो आयोजित व्हावा, अशी खलीची इच्छा आहे.

तीन तासांत दहा लढतींचा रोमांच
तीन तासांच्या या शोमध्ये आठ ते १० लढती होतील. यात विदेशी पहिलवानांसोबतच माझ्या अकादमीत प्रशिक्षण घेणारे कुस्तीपटूही भाग घेतील. विदेशी मल्लांमध्ये अनेक दिग्गज असून त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. याच प्रकारे मनोरंजक कुस्ती क्षेत्रातील स्टार अशी ख्याती असलेली विदेशी महिला कुस्तीपटूही भारतात प्रथमच कुस्तीप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडणार असल्याची माहिती खलीने दिली.

खली म्हणतो, विदेशी मल्लांशी झुंजणार
मीदेखील विदेशी पहिलवानांशी दोन हात करणार आहे. संघनायक मागे राहूच शकत नाही, अशी माहिती खुद्द खलीने दिली. सध्या तो मनोरंजक कुस्तीपासून दूर आहे. त्याने करार वाढवला नाही. कारण, जालंधर येथील स्वत:च्या अकादमीत तो गेल्या ४ महिन्यांपासून शिष्यांना धडे देत आहे. त्याच्या अकादमीत अमेरिकेत प्रशिक्षक म्हणून निवडण्यात आलेल्या कुस्तीपटूंचे प्रशिक्षण सुरू आहे.