दिल्ली - एक खेळाडू म्हणून मी सध्या नव्या जीवनाचा आनंद घेत आहे, म्हणून आधीच्या आयुष्यापेक्षा सध्याचे जीवन हे लाख पटीने चांगले असल्याची माहिती कारगिल युद्धात एक पाय गमावणारे अन् सध्या ब्लेड रनर म्हणून प्रसिद्ध असणारे मेजर देवेंद्रपाल सिंग यांनी दिली.
मी आजवर १४ अर्ध मॅरेथॉनमध्ये सहभागी झालो. त्यापैकी दिल्ली अर्ध मॅरेथॉन २०१३ मध्ये मी दोन तास १० मिनिटे अशी सर्वोत्तम वेळ नोंदवली, असे विंग्ज फॉर लाइफ वर्ल्ड रनचे ब्रँड अॅम्बेसेडर मेजर सिंग यांनी सांगितले.
काही कारणांमुळे एक हात किंवा पाय गमावणार्या देशातील लोकांना मी प्रोत्साहन देत असल्याबद्दल मला समाधान वाटते, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
१९९९ च्या कारगिल युद्धात एलओसीवर डोगरा रेजिमेंटकडून लढताना मेजर सिंग यांना एक पाय गमावावा लागला. या घटनेने त्यांना जीवनात काही वेगळे करण्यासाठी प्रेरित केले अन् त्यांनी लांब पल्ल्याच्या शर्यतीत भाग घेण्यास सुरुवात केली.
लष्करी जीवनात मी अॅथलिट नव्हतो. पाय गमावल्यानंतर काही तरी वेगळे करून दाखवण्याची इच्छा प्रबळ झाली. मी २००९ मध्ये कारकीर्दीतील पहिल्या शर्यतीत धावलो, असे त्यांनी म्हटले.
ऑस्करचे चाहते
ब्लेड रनर नावाने प्रसिद्ध दक्षिण आफ्रिकेच्या आॅस्कर पिस्टोरियसचे मेजर सिंग चाहते आहेत. त्याने जो मार्ग दाखवला तो जगासाठी प्रेरणास्रोत ठरला. त्याच्यासारखी कामगिरी ही खरेच स्वप्नवत आहे, असे ते म्हणाले.
एकाच वेळी धावणार ३५ देशांतील धावपटू
मणक्यांच्या आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी काम करणार्या विंग्ज फॉर लाइफ या संस्थेतर्फे आयोजित वर्ल्ड रनमध्ये भारतासह ३५ देशांतील ३० लाख धावपटू सहभागी होणार आहेत. भारतात या मॅरेथॉनच्या प्रसिद्धीच्या वेळी ब्लेड रनर, बॉलीवूड स्टार आयुष्मान खुराणा, बुद्धिबळपटू तानिया सचदेव आणि रायडर सी. एस. संतोष उपस्थित होते. पाचही खंडांतील ३५ देशांमध्ये एकाच वेळी ही शर्यत होणार आहे. हरियाणाच्या गुडगाव येथे सायंकाळी ४.३० वाजता या
मॅरेथॉनला हिरवी झेंडी दाखवली जाईल.