कटक - भारत आणि श्रीलंकेदरम्यान पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला रविवारपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना कटक येथील बाराबाती स्टेडियमवर खेळवला जाईल. पहिल्या वनडेसाठी दोन्ही संघांनी शनिवारी जोरदार सराव केला.
टीम इंडियासाठी हा सामना महत्त्वाचा असेल. कारण नियमित कर्णधार महेंद्रसिंग धोनीशिवाय भारतीय संघ या मालिकेत खेळत आहे. धोनीला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी
विराट कोहली नेतृत्व करीत आहे.
वेस्ट इंडीज संघाने भारत दौरा अर्धवट सोडून मायदेशी प्रयाण केल्यानंतर बीसीसीआयने श्रीलंकेला
आपला संघ भारतात पाठवण्यास विनंती केली. श्रीलंकन बोर्डाने ही विनंती मान्य केली आणि आता दोन्ही देशांत पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका होत आहे. अँग्लो मॅथ्यूजच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचा संघ चांगली कामगिरी करीत आहे. मात्र, अचानकपणे या दौर्याचे आयोजन केल्यामुळे श्रीलंकेचा संघ अर्धवट तयारीनिशी आला आहे. याचा प्रभाव भारत-अ संघाविरुद्ध झालेल्या सराव सामन्यातही दिसला. सराव सामन्यात श्रीलंकेचा तब्बल ८८ धावांनी पराभव झाला. लसिथ मलिंगा आणि रंगना हेराथ यांच्याशिवाय खेळणार आहे.
दोन्ही संघांची आकडेवारी अशी
- श्रीलंकेने भारतात आतापर्यंत ८ वेळा द्विपक्षीय मालिका खेळली आहे. यातील सात मालिकेत लंकेचा पराभव झाला. लंकेने फक्त एक वेळा १९९७-९८ मध्ये मालिकेत बरोबरी केली होती.
- घरच्या मैदानावर भारताने श्रीलंकेविरुद्ध कधीही एकपेक्षा अधिक सामने गमावलेले नाही.
- सुरेश रैना कटक येथे आपल्या कारकीर्दीचा २०० वा सामना खेळेल.
कर्णधारपद आवडते..
मला नेहमी संघाचे कर्णधारपद भूषवणे आवडते. यामुळे खेळातील विविध क्षेत्रांचे मी मूल्यांकन करू शकतो. स्वत:च्या खेळातही फायदा होतो. तसे बघितले तर मला युवा संघाचे नेतृत्व करणे आवडते. - विराट कोहली, कर्णधार, टीम इंडिया.