आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय युवा संघाचा स्कॉटलंडला दणका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई- सरफराज खान (45) आणि दीपक हुड्डा (24) यांच्या संयमी फलंदाजीच्या बळावर भारतीय युवा क्रिकेट संघाने स्कॉटलंडवर 5 गड्यांनी विजय मिळवला. 19 वर्षांखालील खेळाडूंच्या वर्ल्डकपमध्ये कर्णधार विजय झोलच्या नेतृत्वाखाली भारताने हा विजय साजरा केला. स्कॉटलंडने प्रथम फलंदाजी करताना 29.4 षटकांत सर्वबाद 88 धावा काढल्या. यानंतर भारताने 22.3 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले.स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय चांगलाच अंगलट आला. भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करीत स्कॉटलंडला 29.4 षटकांत अवघ्या 88 धावांत गुंडाळले.
त्यांच्याकडून फक्त दोघांना दोन अंकी धावसंख्या गाठता आली. इतरांनी सपशेल निराशा केली. सलामीवीर उमीद (44) आणि जी. टी. मेन (16) वगळता इतर सर्व फलंदाजांनी खेळपट्टीवर हजेरी लावण्याचे काम केले. भारताकडून कुलदीप यादव आणि ए. गनी यांनी प्रत्येकी 4 गडी बाद केले. कुलदीप यादवने शानदार गोलंदाजी करताना हॅट्ट्रिक घेतली. मिलिंद आणि आवेश खान यांनी प्रत्येकी एकाला टिपले.
स्कॉटलंडला झटपट गुंडाळल्यानंतर भारतीय संघ हे लक्ष्य सहजपणे गाठेल, असे वाटत होते. मात्र, भारताची सुरुवात काही चांगली झाली नाही. भारताचा निम्मा संघ अवघ्या 22 धावांत तंबूत परतला होता. सलामीवीर अंकुश बैन्स (6), हिरवाडकर (0), विजय झोल (4), संजू सॅमसन (7) आणि आर. के. भुई (0) हे आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाल्याने भारतीय संघ दबावात आला. विजय झोलला यावेळी मोठी खेळी करण्यात अपयश आले.
संक्षिप्त धावफलक
स्कॉटलंड : 88. भारत : 5 बाद 92.
सरफराज खान-दीपकची भागीदारी
भारतीय संघ संकटात सापडला असताना सरफराज खान आणि दीपक हुड्डा यांनी सहाव्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी करून विजय मिळवून दिला. सरफराज खानने 51 चेंडूंचा सामना करताना 1 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 45 तर दीपक हुड्डाने 40 चेंडूंत 2 चौकारांसह 24 धावा काढल्या. या दोघांनी जबाबदारीने खेळी करताना अधिक पडझड होऊ दिली नाही. स्कॉटलंडकडून गोसॅनने 3 तर मेनने 2 गडी बाद केले.