Home »Sports »Latest News» Third One Day Match At Sunday

क्रिकेट: क्लीन स्वीप टाळण्याचे आव्हान !

वृत्तसंस्था | Jan 05, 2013, 23:59 PM IST

  • क्रिकेट: क्लीन स्वीप टाळण्याचे आव्हान !

नवी दिल्ली- सलग दोन सामन्यांत लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध क्लीन स्वीपच्या उंबरठ्यावर उभी आहे. ही नामुष्की टाळण्याचे आणि प्रतिष्ठा वाचवण्याचे आव्हान रविवारी होणा-या तिस-या वनडेत धोनी ब्रिगेडसमोर असेल. या लढतीत भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी खेळण्याची शक्यता कमीच आहे. त्याला बॅकअप म्हणून दिनेश कार्तिकला टीममध्ये बोलावण्यात आले आहे.


भारताचा चेन्नईत 8 विकेटने आणि कोलकात्यात 85 धावांनी पराभव झाला होता. आता आपल्या जमिनीवर द्विपक्षीय मालिकेतील सर्व सामने गमावण्याच्या नामुष्कीतून वाचण्यासाठी टीम इंडियाच्या सर्व फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. आपल्या दिग्गज फलंदाजांनी गेल्या दोन सामन्यांत फक्त हजेरी लावण्याचे काम केले. कर्णधार धोनीने मात्र टिकून खेळण्याचा प्रयत्न केला. टीम इंडियाच्या सुमार कामगिरीने चाहतेसुद्धा चांगलेच निराश झाले आहेत.

कॅप्टन धोनी म्हणाला...

1. अंतिम अकरा खेळाडूंचा कोणताही निर्णय सामन्यापूर्वीच घेतला जाईल. रहाणेला आतापर्यंत जितकी संधी मिळाली आहे त्यात त्याने चांगली कामगिरी केली. आता या मालिकेत चांगली कामगिरी करू न शकलेल्या खेळाडूंचीसुद्धा आपण पाठराखण केली पाहिजे.
2. दिल्ली वनडेत प्रथम फलंदाजी करताना किंवा धावांचा पाठलाग करताना चांगली फलंदाजी करण्याचा आमचा प्रयत्न असेल. आमची मोठी अडचण ही झाली की, फलंदाज चालले त्या वेळी गोलंदाज अपयशी ठरले आणि गोलंदाज यशस्वी ठरले त्या वेळी आमचे फलंदाज फ्लॉप झाले. एक संघ म्हणून आम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल.
3. मी दबावाकडे लक्ष दिले असते तर केव्हाच मोडल्या गेलो असतो. आम्ही मैदानाबाहेरील चर्चेला अधिक महत्त्व देत नाही. आम्ही मीडियाच्या चर्चेनुसार चाललो तर आम्हाला 30, 40 संघ तयार करावे लागतील आणि प्रत्येक पराभवानंतर टीम बदलावी लागेल.
4. मी देशी-विदेशी कोचच्या बाबत विचार करीत नाही. खेळाडूंनी आपल्या प्रदर्शनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. कोच मैदानात उतरू शकत नाही.
5. ही कोटलाची नेहमीसारखी खेळपट्टी दिसत आहे. सामन्याआधी पिच बघून आम्ही अकरा खेळाडूंचा विचार करू.
6. या सामन्यात खेळण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.

भारतासमोरील अडचणी
1. पाकचे वेगवान गोलंदाज मो. इरफान, जुनेद खान आणि उमर गुल यांनी भारतीय दिग्गजांना चांगलेच त्रस्त केले आहे.
2. टॉप ऑर्डरचे चार फलंदाज सेहवाग, गंभीर, विराट कोहली आणि युवराजसिंग मागच्या दोन सामन्यांत अपयशी ठरले.
3. धोनीने मागच्या सामन्यात 113, दुस-या सामन्यात नाबाद 54 धावा काढल्या. मात्र, दुस-या टोकाने फलंदाजांचे सहकार्य नाही.
4. भुवनेश्वरकुमार, अशोक डिंडा, ईशांत शर्मा हे तिघेही पाक गोलंदाजांप्रमाणे कामगिरी करू शकले नाही.
5. कर्णधार महेंद्रसिंग धोनी कंबरेच्या दुखण्यामुळे खेळू शकला नाही, तर भारताची फलंदाजी अधिक दुबळी होईल. आधीच फलंदाज फॉर्मात नाहीत.

दिल्लीतही पाकचा विजय
रेकॉर्डचा विचार केला, तर कोटलावर आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकमेव वनडे सामना 2005 मध्ये झाला होता. हा सामना पाकिस्तानने जिंकला होता.

सरावास युवराजची अनुपस्थिती
रविवारी महत्त्वाचा सामना असताना शनिवारी युवराजसिंगने नेट प्रॅक्टिसला दांडी मारली. यावर शनिवारी नेट प्रॅक्टिस सक्तीची नव्हती. यामुळे युवराज सरावाला आला नाही, असे धोनीने सांगितले. सकाळी सरावादरम्यान कंबरेत वेदना वाढल्या, यामुळे मी चिंतेत आहे. मी तत्काळ संघ व्यवस्थापनाला याबाबत माहिती दिली. यामुळे बॅकअप म्हणून दिनेश कार्तिकला बोलावले आहे. तुझ्या अनुपस्थितीत टीमचे नेतृत्व कोण करेल, असे विचारले असता धोनीने या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले.

पाक खेळाडू होणार मालामाल

पाक राष्‍ट्रपती आसीफ अली झरदारी यांनी भारताविरुद्ध दोन वनडे सामने, एक टी-20 सामन्यात सर्वाधिक धावा काढणा-या आणि सर्वाधिक विकेट घेणा-याला प्रत्येकी 5 लाख देण्याची घोषणा केली आहे. पाकने तिसरा सामना जिंकल्यास त्यांना असेच बक्षी मिळेल. आतापर्यंत हफिज, उमर गुल, नासेर जमशेद, जुनेद खान, अजमल यांनी बक्षीस निश्चित केले.

टीम खालीलप्रमाणे

भारत :महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, विराट कोहली, युवराजसिंग, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा, अशोक डिंडा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, अमित मिश्रा, शमी अहेमद.
पाकिस्तान : मिसबाह-उल-हक (कर्णधार), नासेर जमशेद, मो. हफिज, अझहर अली, युनूस खान, शोएब मलिक, कामरान अकमल, सईद अजमल, उमर गुल, जुनेद खान, मो. इरफान, सोहेल तन्वीर, उमर अकमल, अन्वर अली.

खेळपट्टी : वेगवान गोलंदाजांना मदत मिळवण्याची शक्यता.
हवामान : थंड आणि ओलसर.
टॉस : जो जिंकेल, तो प्रथम गोलंदाजी घेऊ शकतो.

खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह ?
उत्तर भारतात सध्या कडाक्याची थंडी पडत होत. अशा परिस्थितीत सामना दुपारी 12.00 वाजता सुरू झाला, तरीही खेळपट्टी थोडी ओलसर असू शकते. यामुळे टॉसची भूमिका पुन्हा एकदा निर्णायक ठरू शकेल. या खेळपट्टीवर सुरुवातीपासून वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. येथे नाणेफेक जिंकणारी टीम प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेऊ शकते. दुस-या डावाच्या वेळी थंडी आणखी वाढेल. शिवाय गोलंदाजांना चेंडूवर ग्रीप घेण्यात अडचण येऊ शकते.


सेहवाग, गंभीरकडे लक्ष गेल्या काही दिवसांपासून फॉर्मात नसलेले सलामीवीर सेहवाग आणि गंभीरच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. घरच्या मैदानावर हे दोघे कसे खेळतात, यावर बरेच काही अवलंबून आहे.

Next Article

Recommended