मुंबई - आम्हाला भारतीय खेळपट्टी आणि भारतीय खेळाडूंचा चांगला अभ्यास असल्याने आम्ही भारतीय क्रिकेट संघाला धक्का देऊ शकतो, असे आत्मविश्वासपूर्ण उद्गार रिची रिचर्डसनने भारताच्या दौ-यावरील पत्रकार परिषदेत येथे काढले.
वेस्ट इंडीजचा संघ भारताच्या क्रिकेट संघाविरुद्ध पाचदिवसीय, एकदिवसीय व टी-२० या सामन्यासाठी भारतात आला असून ३ ऑक्टोबरपासून सुरू होणा-या एकदिवसीय सराव सामन्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना वेस्ट इंडीज संघाचा माजी कर्णधार रिची रिचर्डसन याने वेस्ट इंडीज संघ भारताच्या भूमीवर चांगली कामगिरी करेल, काही सामन्यांमध्ये भारताला धक्का देऊ शकेल, असे भाकीत वर्तवले.
भारतातील विकेट व एकंदरीत हवामान वेस्ट इंडीजशी मिळतेजुळते असून नुकतेच आमच्या संघाने भारतीय उपखंडातील बांगलादेशमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली असून त्याचा आमच्या खेळाडूंना नक्कीच फायदा होईल. तसेच डॅरेन ब्राव्हो कर्णधार अत्यंत प्रतिभावान खेळाडू असून भारतामध्ये गेली कित्येक वर्षे सुरू असलेल्या आयपीएल या क्रिकेट सामन्यांमध्ये खेळत आहे. त्यामुळे भारतीय वातावरण, येथील हवामान, विकेट आणि भारतीय खेळाडूंची बलस्थाने आणि कच्चे दुवे याबाबत त्यास चांगली ओळख आहे. या सर्वांचा आमच्या संघाला नक्कीच फायदा होईल, असे यावेळी रिची रिचर्डसनने नमूद केले.