आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • This Year IPL Will Play Outside India Due To Election

निवडणुकांमुळे या वेळीही आयपीएल स्पर्धा भारताबाहेर होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गत 2009 प्रमाणे यंदाही आयपीएल आयोजनाच्या आड देशात होणा-या निवडणुका येणार आहेत. याची पूर्वकल्पना असलेल्या बीसीसीआयने 2014 च्या आयपीएल आयोजनासाठी अन्य पर्यायांचा विचार केला आहे. 2009च्या आयपीएल आयोजनाचे यजमान दक्षिण आफ्रिका, भारतीय उपखंडातील भारतीय, पाकिस्तानी, श्रीलंकन आणि बांगलादेशींची अधिक संख्या असलेले संयुक्त अरब अमिरात, शेजारचे बांगलादेश आणि श्रीलंका ही चार नावे सध्या बीसीसीआयसमोर आहेत. गत सप्ताहात चेन्नई येथील कार्यकारी समितीच्या बैठकीत एन. श्रीनिवासन आयपीएलबाबत बीसीसीआयची भूमिका स्पष्ट करणार होते. त्यांच्या मातोश्रींच्या निधनामुळे ती गोष्ट गुलदस्त्यातच राहिली.
त्या गोष्टीबाबत श्रीनिवासन यांच्या निकटवर्तीयांनी दिलेली माहिती अशी की, दक्षिण आफ्रिकेचा पर्याय सर्वप्रथम बाद होणार आहे. बीसीसीआय आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड यांचे सध्या चांगले संबंध नाहीत. सीईओ लॉरगॅट यांच्या नियुक्तीपासून हे संबंध बिघडले, ते अजूनही तसेच आहेत. दक्षिण आफ्रिकेचा पर्याय टेलिव्हिजन कंपन्यांना नको आहे. कारण दक्षिण आफ्रिकेत स्पर्धा घेतल्यास थेट प्रक्षेपणाच्या वेळा भारतीय प्रेक्षकांना व टेलिव्हिजन पाहणा-यांना अडचणीच्या वाटतात. हाच प्रश्न संयुक्त अरब अमिरातीमधील वेळांच्या बाबतीतही निर्माण होणार आहे. त्यामुळे भारतीय वेळेप्रमाणेच अर्ध्या तासाचा फरक असणा-या श्रीलंका किंवा बांगलादेश या दोन पर्यायांचा प्राधान्याने विचार होऊ शकतो.
बांगलादेशातील अस्थिर राजकीय परिस्थिती हा अडचणीचा मुद्दा पुढे येऊ शकतो. मात्र, आयपीएल स्पर्धेआधी तेथे ट्वेन्टी-20 विश्वचषक व आशिया कप क्रिकेट स्पर्धाही होणार आहेत. त्या स्पर्धेच्या निमित्ताने बांगलादेशातील सर्व अडचणींचे मुद्दे आणि प्रश्नांची उत्तरेही मिळणार आहे.
बांगलादेशात सर्वात कमी खर्चात स्पर्धा होईल तसेच दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांमुळे तेथे क्रिकेट सामन्यांच्या आयोजनासाठीची सर्व व्यवस्था सज्ज असेल, असाही दावा केला जात आहे.
निवडणुकीनंतर स्पर्धेचा विचार!
सरकारने बीसीसीआयला निवडणुकांमुळे क्रिकेटसाठी सुरक्षा देऊ शकत नाही, असे स्पष्ट केले आहे. देशातील निवडणुका 10 एप्रिल ते 10 मे या कालावधीत होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे निवडणुकांनंतर स्पर्धा देशातच आयोजित करता येईल का, या पर्यायाचाही बीसीसीआय विचार करत आहे.