आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today Australia England Play First One Day Match

ऑस्ट्रेलिया-इंग्लंड संघांत आजपासून रंगणार तिरंगी मालिकेचा रोमांच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात शुक्रवारी तिरंगी मालिकेतील पहिला वनडे रंगणार आहे. कसोटी मालिकेत भारताला २-० ने हरवल्यानंतर आता तिरंगी मालिका जिंकण्याच्या इराद्याने यजमान संघ मैदानावर उतरेल. दुसरीकडे पुढच्या महिन्यात सुरू होत असलेल्या वनडे वर्ल्डकपपूर्वी सरावाच्या दृष्टीने इंग्लंडसाठी ही तिरंगी मालिका महत्त्वाची ठरेल. तिरंगी मालिकेतील तिसरा संघ टीम इंडिया आहे.

यजमान ऑस्ट्रेलियाचा आत्मविश्वास सध्या बुलंदीवर आहे. सिडनी क्रिकेटच्या मैदानावर होणा-या या सामन्याद्वारे आणि मालिकेत कांगारूंना आपली विश्वचषकासाठीची दावेदार तपासता येणार आहे. रविवारी कांगारूंना मेलबर्नच्या मैदानात विश्वविजेत्या भारताशी लढायचे आहे. या मालिकेमुळे स्पर्धेतील तिन्ही संघांना वर्ल्डकपपूर्वी आपापल्या खेळाडूंचे फॉर्म, फलंदाजी क्रम, गोलंदाजी फळी तसेच अंतिम अकरा खेळाडूंचे कॉम्बिनेशन तपासता येईल.

इंग्लंडसाठी आव्हान
ही मालिका पाहुण्या इंग्लंड संघासाठी एक आव्हानच असेल. इंग्लंडचा संघ एका नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. सध्या इंग्लंडचे कर्णधारपद इयान मोर्गनकडे सोपवण्यात आले आहे. तसेच तोच या यंदाच्या वर्ल्डकपमध्येही संघाचे नेतृत्व करेल. गेल्या डिसेंबर महिन्यातच इंग्लंडने अंत्यत महत्त्वाचा निर्णय घेताना अॅलेस्टर कुकच्या जागी मोर्गनची नियुक्ती केली. मोर्गनच्या नेतृत्वाखाली संघबांधणी करण्याचे कठीण आव्हान इंग्लंडपुढे असेल. दोन सराव सामन्यांत इंग्लंडने मोर्गनच्या नेतृत्वाला साथ देताना तब्ल ७५५ धावांचा पाऊस पाडला. त्यामुळे आता तिरंगी मालिकेतही मोर्गनच्या खेळीचा फायदा हाेण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी त्याला ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघाच्या अव्वल गोलंदाजांच्या आव्हानाला सामाेरे जावे लागेल. यातील त्याचे यश हे संघासाठी महत्त्वाचे ठरेल.

मोर्गनचा फॉर्मशी संघर्ष
इंग्लंडचा नवा कर्णधार इयान मोर्गन स्वत: फॉर्मशी झंुजत आहे. गेल्या १९ डावांत त्याने एक अर्धशतक ठाेकले. इंग्लंडचा वनडे संघसुद्धा फॉर्मात येण्यासाठी प्रयत्न करेल. इंग्लंडचा गत ३ मालिकेत श्रीलंका व भारताविरुद्ध त्यांच्या देशात पराभव झाला.

दोन्ही संघ असे
ऑस्ट्रेलिया : जॉर्ज बेली (कर्णधार), स्टीव्हन स्मिथ, पॅट कमिन्स, झेव्हियर डोहर्ती, फ्युकनर, अॅरोन फिंच, ब्रेड हॅडिन, जोस हॅझलवूड, मिशेल जॉन्सन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसन, गुरविंदर संधू.

इंग्लंड : इयान मोर्गन (कर्णधार), मोईन अली, अँडरसन, गॅरी बॅलेंस, इयान बेल, रवी बोपारा, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, स्टीव्हन फिन, अॅलेक्स हाल्स, क्रिस जॉर्डन, ज्यो रूट, जेम्स टेलर, जेम्स ट्रेडवेल, क्रिस वोक्स.

ऑस्ट्रेलियाला सर्वाधिक पसंती
यजमान ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिकेचे विजेतेपद पटकावण्याच्या दृष्टीने फेव्हरेट मानला जात आहे. स्नायू दुखावल्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचा नियमित कर्णधार मायकेल क्लार्क या मालिकेत खेळणार नाही. त्याच्या जागी जॉर्ज बेली संघाचे नेतृत्व करेल. इंग्लंडप्रमाणे ऑस्ट्रेलियालासुद्धा आपल्या काही प्रमुख खेळाडूंचा फॉर्म, फिटनेस तपासण्याची संधी या तिरंगी मालिकेत असेल.