आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today Hocky India League Starts, Noted Hocky Player Participtes

हॉकी इंडिया लीग आजपासून; दिग्गज हॉकीपटू सहभागी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहाली - दुस-या सत्राच्या हॉकी इंडिया लीगला शनिवारपासून प्रारंभ होत आहे. रंगारंग कार्यक्रमाने या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. या वेळी पंजाब वॉरियर्स आणि दिल्ली वेव्हरायडर्स यांच्यात उद्घाटनीय सामना होईल.
हॉकी इंडियाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत आंतरराष्‍ट्रीय स्तरावरील नावाजलेल्या 141 खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय 79 ऑलिम्पियनही या स्पर्धेत विविध संघांचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यामुळे ही स्पर्धा अधिक रोमांचक होईल, असा विश्वास आयोजन समितीचे नरेंद्र बत्रा यांनी व्यक्त केला.
या स्पर्धेतील विजेत्या टीमवर कोट्यवधी रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. यातील विजेत्या टीमला 2.5 कोटींसह पारितोषिक देऊन गौरवण्यात येईल. याशिवाय उपविजेता संघ 1.5 कोटी व ट्रॉफीचा मानकरी ठरेल.
पंजाबचे पारडे अधिक जड
सलामी सामन्यासाठी सज्ज असलेल्या पंजाब वॉरियर्सचे पारडे अधिक जड आहे. या टीममध्ये युवा खेळाडूंची फळी आहे. सोबत जुन्या दिग्गज खेळाडूंचा अनुभवही आहे. ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा जेमी डवायेर हा या सामन्यात पंजाबचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम सामना खेळेल. यासह गोलरक्षक याप स्टॉकमॅन आणि इग्नेस टिर्कीमुळे पंजाबची बाजू अधिक मजबूत झाली आहे.
दिल्लीचा दबदबा
सरदारा सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणा-या दिल्ली वेव्हरायडर्स टीमचा पंजाबविरुद्ध दबदबा आहे. गतवर्षी दोन्ही टीममध्ये उपांत्य लढत रंगली होती. या लढतीत दिल्लीने पंजाबचा 3-1 अशा फरकाने धुव्वा उडवला होता. याच कामगिरीला सलामी सामन्यात उजाळा देण्याचा दिल्लीचा प्रयत्न असेल.
‘गौरव’चे खास आकर्षण
दुस-या सत्राच्या हॉकी इंडिया लीगमध्ये ‘गौरव’ नावाचा शुभंकर हा चाहत्यांसाठी खास आकर्षण असेल. याचे गुरुवारी नुकतेच अनावरण करण्यात आले. चाहत्यांना या स्पर्धेकडे आकर्षित करण्याचा हॉकी इंडियाचा प्रयत्न आहे.
181 देशांतील चाहत्यांना हॉकी इंडिया लीगच्या सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे. स्टार स्पोर्टस लीगमधील सामन्यांचे थेट प्रक्षेपण करणार आहे. भारतात झपाट्याने हॉकीचा विकास करण्यासाठी स्टार इंडियाने कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे.