आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनी ब्रिगेडची कसोटी !,न्यूझीलंडविरुद्ध आजपासून झुंज रंगणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑकलंड - दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी, वनडे आणि न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका गमावल्यानंतर आता यजमान किवीज संघाविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याचे आव्हान टीम इंडियासमोर आहे. पराभवाच्या हॅट्ट्रिकनंतर धोनी ब्रिगेड पाचदिवसीय सामन्याच्या पहिल्या दिवशी कशी कामगिरी करते याकडे सर्वांचे लक्ष असेल. आफ्रिकेच्या उसळत्या खेळपट्ट्यांवर टीम इंडियाची ही सर्व अर्थाने ‘कसोटी’ असेल.
भारतीय संघाने ही दोन सामन्यांची कसोटी मालिका जिंकली अथवा ड्रॉ जरी केली तरीही आयसीसी कसोटी क्रमवारीतील आपले दुस-या क्रमांकाचे स्थान कायम राहील. भारताने कसोटी मालिका गमावली तर वनडे क्रमवारीप्रमाणे येथेही क्रमवारीत नुकसान होईल.
सराव सामन्यात चांगली कामगिरी
नुकत्याच झालेल्या सराव सामन्यात टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. मधल्या फळीने चांगली कामगिरी करून आशा पल्लवित केल्या. गोलंदाजीत ईश्वर पांडेची कामगिरी चांगली ठरली. अशा परिस्थितीत कर्णधार धोनीसमोर मैदानावर सर्वश्रेष्ठ अकरा खेळाडू खेळवण्याची जबाबदारी असेल. शिवाय आपली रणनीती यशस्वी ठरेल यासाठी त्याचे प्रयत्न असतील.
भारताची मजबूत बाजू
कर्णधार धोनीला मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, अंबाती रायडू, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, शिखर धवन यांच्याकडून चांगल्या फलंदाजीची आशा असेल. याशिवाय आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा धावा काढण्यात तरबेज आहेत. गोलंदाजीची मदार जहीर खान आणि मोहंमद शमी यांच्यावर असेल.
न्यूझीलंडचा संघ संतुलित
न्यूझीलंडचा संघ सध्या संतुलित दिसत आहे. त्यांच्याकडे वनडेत शानदार कामगिरी करणारे कोरी अँडरसन, केन विलियसन, रॉस टेलर, जेसी रायडर, कर्णधार ब्रेंडन मॅक्लुम, बी. जे. वॉटलिंग, डग बे्रसवेलसारखे फलंदाज कसोटीतही उपलब्ध आहेत. याशिवाय भारतीय वंशाचा सोढी, ट्रेंट बोल्ट आणि टीम साउथीसारखे चांगले गोलंदाज आहेत. घरच्या मैदानावर प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळण्याचा फायदा यजमानांना मिळू शकतो.
मोठ्या स्पेलसाठी तयार व्हा : धोनी
न्यूझीलंडविरुद्ध गुरुवारपासून सुरू होत असलेल्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिका दौ-याप्रमाणे भारतीय गोलंदाजांनी येथेही मोठ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यास सज्ज व्हावे, असे टीम इंडियाचा कर्णधार धोनीने म्हटले. दक्षिण आफ्रिकेत आमच्या गोलंदाजांना लांब स्पेलमध्ये गोलंदाजी करावी लागली. न्यूझीलंडविरुद्धसुद्धा त्यांना असेच करावे लागेल. आफ्रिकेत चौथ्या दिवशी चौथ्या स्पेलमध्ये आपले गोलंदाज फ्रेश होते, ही चांगली बाब आहे. असे असले तरीही गोलंदाजांना छोट्या स्पेलमध्येसुद्धा आजमावले जाईल. दुस-या टोकाने रवींद्र जडेजा लांब स्पेल करण्यास सक्षम आहे. सर्वकाही परिस्थितीवर अवलंबून असेल, असे माहीने स्पष्ट केले.
टॉस ठरेल निर्णायक
ही बातमी वाचण्यासाठी हातात पडेपर्यंत सामन्यात टॉसचा निर्णय झालेला असेल. दोन्ही संघासाठी नाणेफेकीची भूमिका महत्त्वाची असेल. या खेळपट्टीवर प्रथम गोलंदाजी करणा-या संघाला अधिक फायदा होऊ शकतो. न्यूझीलंडचा संघ शॉर्टपिच चेंडूंचा मारा करून भारतीय फलंदाजांना त्रस्त करेल, अशी शक्यता आहे.
संघात बदल नाही : मॅक्लुम
ईडन पार्कवर गवत असून भारतीय वंशाच्या सोढीसाठी भारतीय फलंदाजांचा सामना करणे हे एक आव्हानच असेल. गवत असलेल्या खेळपट्टीवर खेळणे कठीण असते. आम्हाला येथे अतिरिक्त बाऊन्स आणि चेंडूला थोडे वळणही मिळण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्लुमने व्यक्त केली. भारताकडे चांगले गोलंदाज आहेत. मात्र, चेंडूला अधिक टर्न मिळाल्यास आम्हाला फायदा होईल. भारतीय खेळाडूंना रिव्हर्स स्विंग होणा-या खेळपट्ट्यांवर खेळण्याची सवय असते याचाही आम्ही लाभ घेऊ, असे मॅक्लुम म्हणाला. आमचे फलंदाज गोलंदाजांचा सामना करण्यास समर्थ असल्याचेही त्याने नमूद केले.
दोन्ही संभाव्य संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे, आर. अश्विन, जहीर खान, भुवनेश्वरकुमार, मो. शमी, ईश्वर पांडे, अंबाती रायडू, ईशांत शर्मा, उमेश यादव.
न्यूझीलंड : ब्रेंडन मॅक्लुम (कर्णधार), कोरी अँडरसन, ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, पीटर फुल्टन, हामिश रुदरफोर्ड, जेसी रायडर, इश सोढी, टीम साउथी, रॉस टेलर, नेल वॅग्नर, केन विलियसन, बी. जे. वॉटलिंग.