आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today India New Zealand Play Second One Day Match

मालिका बरोबरीसाठी धोनी ब्रिगेडचे प्रयत्न,भारत-न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना आज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॅमिल्टन - दक्षिण आफ्रिकेनंतर न्यूझीलंडच्या भूमीवरसुद्धा सुमार कामगिरीमुळे टीकेचे लक्ष्य ठरलेल्या टीम इंडियाला बुधवारी दुसरा एकदिवसीय सामना खेळायचा आहे. पहिल्या वनडेत न्यूझीलंडने 24 धावांनी विजय मिळवला होता. उसळत्या खेळपट्टीवर चांगल्या कामगिरीचा दबाव भारतीय संघावर असेल. मालिकेत बरोबरीसाठी टीम इंडिया खेळेल.
नेपियर येथे झालेल्या पहिल्या वनडेत भारतीय संघाकडून विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि शिखर धवन यांनाच धावा काढता आल्या. इतर सर्व फलंदाज फ्लॉप ठरले. अशीच परिस्थिती गोलंदाजांची होती. यामुळे टीम इंडिया विजयासमीप पोहोचूनही विजय मिळवू शकली नाही. दुसरीकडे न्यूझीलंडची टीम कर्णधार ब्रेंडन मॅक्लुमच्या शानदार नेतृत्वाखाली भारतीयांच्या दुबळ्या बाजूचा फायदा उचलण्यास हॅमिल्टन येथेही सज्ज आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 1-0 ने मागे असून, दुस-या सामन्यात विजयासाठी महेंद्रसिंग धोनीला विशेष रणनीती तयार करावी लागेल.
मॅक्लिनघन सर्वाधिक घातक
19 वनडेत 47 विकेट घेणारा वेगवान गोलंदाज मॅक्लिनघनने पहिल्या वनडेत भारताविरुद्ध चार गडी बाद केले होते. तीन गडी बाद करून तो वनडेत सर्वाधिक वेगाने 50 गडी बाद करण्याचा विक्रम करू शकतो. या विक्रमासाठी तो जोरदार प्रयत्न करेल.
ईशांत शर्माला नारळ ?
पहिल्या वनडेत 72 धावा मोजणा-या ईशांत शर्माला दुस-या वनडेसाठी नारळ मिळू शकते. प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याच्या समावेशाची शक्यता कमीच आहे. अशा परिस्थितीत वेगवान गोलंदाजीची मदार मोहंमद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांच्यावर असेल. मध्य प्रदेशचा वेगवान गोलंदाज ईश्वर पांडेला या सामन्यात पदार्पणाची संधी मिळू शकते. ईशांतशिवाय पहिल्या लढतीत रवींद्र जडेजाने 61 धावा मोजल्या. अश्विननेसुद्धा 52 धावा दिल्या, मात्र एकही गडी बाद करू शकला नाही.
मिल्न दुखापतीमुळे आऊट; बेनेटचा संघात समावेश
दुस-या वनडेपूर्वी न्यूझीलंडला जोरदार धक्का बसला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज अ‍ॅडम मिल्न पोटातील स्नायू दुखावल्यामुळे मालिकेतून बाहेर झाला आहे. मिल्नच्या जागी मध्यमगती गोलंदाज हामिश बेनेटचा किवी संघात समावेश करण्यात आला आहे. मिल्नने वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात 153 किमी ताशी वेगाने चेंडू टाकला होता. भारताविरुद्धसुद्धा पहिल्या वनडेत त्याने 150 च्या वेगाने गोलंदाजी केली होती. या युवा गोलंदाजाने नोव्हेंबर 2012 मध्ये र्शीलंकेविरुद्ध वनडेत पदार्पण केले होते.
संभाव्य संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, स्टुअर्ट बिन्नी, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, ईशांत शर्मा, मो. शमी, ईश्वर पांडे, भुवनेश्वर.
न्यूझीलंड : ब्रेंडन मॅक्लुम (भारत), मार्टिन गुप्तिल, जेसी रायडर, केन विलियसन, रॉस टेलर, कोरी अँडरसन, जेम्स निशाम, ल्युक रोंची, नॅथन मॅक्लुम, हामिश बेनेट, केली मिल्स, टीम साऊथी, मॅक्लिनघन.