डर्बिशायर- इंग्लंडच्या दौ-यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाचा दुसरा सरावाचा सामना येथे आजपासून ( मंगळवार) डर्बिशायरविरुद्ध होणार आहे. 9 जुलैपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी सिरीजला प्रारंभ होणार असून त्यापूर्वीचा हा दुसरा सरावाचा सामना आहे.
लिसेस्टरशायर विरुद्धचा तीन दिवसांचा पहिला सराव सामना अनिर्णीत राहिला. या सामन्यात पावसाचा बराच अडथळा आला असला तरी भारतीय फलंदाजांनी ब-यापैकी फलंदाजीचा सराव केला. डर्बिशायर विरुद्धच्या सामन्यात कर्णधार धोनी आपल्या संघातील गोलंदाजांच्या कामगिरीवर अधिक लक्ष ठेवेल. इंग्लंडच्या वेगवान खेळपट्टय़ांवर चांगली गोलंदाजी करण्यासाठी भारतीय गोलंदाजांना निश्चितच कसरत करावी लागणार आहे.