छायाचित्र: कोचीत सरावादरम्यान मंगळवारी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि
विराट कोहली.
कोची - भारत आणि वेस्ट इंडीजदरम्यान वनडे मालिकेतील पहिला सामना बुधवारी कोचीच्या स्टेडियमवर खेळवला जाईल. भारतीय संघ क्रमवारीत नंबर वन टीम असल्याने हा सामना जिंकण्याच्या इराद्यानेच
टीम इंडिया मैदानावर उतरेल. आक्रमक फलंदाज क्रिस गेल या मालिकेत खेळत नसला, तरीही वेस्ट इंडीजकडे बरेच स्फोटक फलंदाज आहेत. यामुळे टीम इंडिया विंडीजला सहज घेण्याची चूक करू शकत नाही.
तब्बल एक महिन्याच्या विश्रांतीनंतर टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे. सप्टेंबर महिन्यात भारताने इंग्लंडविरुद्ध त्यांच्याच भूमीवर द्विपक्षीय वनडे मालिका जिंकली होती. पुढच्या वर्षी होणा-या वनडे वर्ल्डकपसाठी
आपली तयारी किती मजबूत झाली आहे, याची तपासणी या मालिकेत भारत आणि वेस्ट इंडीजचे संघ करतील. यादरम्यान हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोचीत बुधवारी पाऊस पडण्याची ४० टक्के शक्यता आहे.
टीम इंडिया आहे फॉर्मात
भारताने एक महिन्यापूर्वी इंग्लंडला पराभूत केले होते. सुरेश रैना, रवींद्र जडेजा, धोनीने नुकत्याच संपलेल्या चॅम्पियन्स लीगमध्येसुद्धा चांगला फॉर्म दाखवला. घरच्या मैदानावर सामना असल्याने टीम इंडियाचे खेळाडू पूर्ण आत्मविश्वासाने मैदानावर उतरतील. संघ बांधणीचा विचार केला, तर रोहित शर्मा संघात नसल्याने शिखर धवनसोबत अजिंक्य रहाणे सलामीला खेळेल. फिरकीपटूंत आर. अश्विनच्या जागी अमित मिश्राला संधी मिळू शकते. धोनी एक प्रयोग म्हणून चायनामन अर्थात डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादवलासुद्धा संधी देऊ शकतो.
विंडीजला गेलची उणीव जाणवणार
पाहुण्या वेस्ट इंडीज संघाला त्यांचा सर्वाधिक स्फोटक फलंदाज क्रिस गेलची उणीव जाणवणार आहे. डॅरेन आणि ड्वेन ब्राव्हो बंधूंशिवाय केरोन पोलार्ड, डॅरेन सॅमी, आंद्रे रसेल या अष्टपैलू खेळाडूंच्या उपस्थितीने विंडीजच्या ताकदीला कमी लेखता येणार नाही. याशिवाय लेंडल सिमन्स, मार्लोन सॅम्युअल्ससारखे मजबूत फलंदाज त्यांच्याकडे आहेत. गोलंदाजीत केमर रोच, जेरोम टेलर, रवी रामपॉलसारखे खतरनाक गोलंदाजही पाहुण्यांकडे आहेत. असे असले तरीही पाहुण्या संघाला गेल आिण िफरकीपटू सुनील नरेनची अनुपस्थिती जाणवणार.
टॉस व पाऊस ठरतील महत्त्वाचे : धोनी
कोची वनडेत टॉस आिण हवामान महत्त्वाची भूमिका बजावतील, असे भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने म्हटले. नंतर गोलंदाजी करणे िफरकीपटूंसाठी कठीण काम ठरू शकते. शिवाय मैदानावर दवबिंदूही असतील. दवबिंदू असताना गोलंदाजांना अडचण येते, असे त्याने म्हटले. टॉस िजंकल्यास प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट संकेत धोनीने मंगळवारी िदले.
दोन्ही संभाव्य संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार, मोहंमद शमी, मोहित शर्मा, उमेश यादव, मुरली विजय, कुलदीप यादव.
वेस्ट इंडीज : ड्वेन ब्राव्हो (कर्णधार), लेंडल सिमन्स, डॅरेन ब्राव्हो, मार्लोन सॅम्युअल्स, जेसन होल्डर, लियोन जॉन्सन, केरोन पोलार्ड, दिनेश रामदीन, रवी रामपॉल, केमर रोच, आंद्रे रसेल, डॅरेन सॅमी, ड्वेन स्मिथ, जेरोम टेलर.
सामना रद्द झाला, तर प्रेक्षकांचे पैसे परत मिळणार
सामन्यासाठी स्टेडियमची बहुतेक तिकिटांची विक्री झाली आहे. मात्र, दुर्दैवाने पाऊस आला आणि सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर आम्ही प्रेक्षकांचे पूर्ण पैसे परत करणार, अशी माहिती केरळ क्रिकेट संघटनेच्या एका अधिका-याने दिली.
भारतीय फिरकीपटूंपासून सावधान : ब्राव्हो
आम्ही भारतीय गोलंदाजांच्या मागच्या गोलंदाजीच्या व्हिडिओ क्लिप बघितल्या आहेत. विशेषत: आम्हाला भारतीय फिरकीपटूंपासून सावध राहावे लागेल. भारतीय फिरकीपटू मालिकेत निर्णायक भूमिका पार पाडू शकतात, असे विंडीजच्या डॅरेन ब्राव्होने म्हटले.