अहमदाबाद - शिखर धवन आणि अजिंक्य रहाणेची स्वप्नवत सलामी तसेच गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या बळावर भारताने पहिला एकदिवसीय सामना जिंकला. हेच ‘विराट’ इरादे घेऊन
टीम इंडिया आज दुसरा सामना खेळेल. भारत-श्रीलंकेदरम्यान सरदार पटेल मैदानावर गुरुवारी दुसरी वनडे होणार आहे. सामन्याची सर्व तिकिटे विकली आहेत. चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती फक्त सामन्याची...
प्रदीर्घ काळानंतर फॉर्मात परतलेला शिखर धवन, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, वेगवान गोलंदाज ईशांत शर्मासह इतर खेळाडूंच्या योगदानामुळे भारताने पाच सामन्यांच्या मालिकेतील कटकचा सामना १६९ धावांनी जिंकला. मालिकेत १-० ने आघाडी घेतली. मात्र, केवळ विजय मिळवणे हे गत विश्वजेत्यांचे लक्ष्य नसून एक मजबूत संघाचे उदाहरण पेश करण्याचा टीम इंडियाचा मानस आहे. पुढील वर्षी होणारी विश्वचषक स्पर्धा जिंकण्याचे संघाचे स्वप्न आहे.
इंग्लंडविरुद्ध सुमार फलंदाजी करणा-या धवनने गेल्या सामन्यात ११३, तर रहाणेने १११ धावा लुटल्या. तो सामनावीर ठरला. दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या ईशांतनेही ४ बळी टिपून पुनरागमन सार्थकी लावले. महेंद्रसिंग धोनीच्या गैरहजेरीत पहिल्या तीन सामन्यांचे नेतृत्व विराट कोहलीकडे आहे. त्याने पहिला सामना जिंकून दिला. कटक वनडे भारताने मोठ्या फरकाने जिंकली. शिवाय संघाची एकूण कामगिरी तसेच खेळाडूंचा जुना सुवर्णकाळ परतणे आगामी विश्वचषकासाठी महत्त्वपूर्ण आहे.
दुसरीकडे श्रीलंकेची तयारी नसल्याचे कर्णधार मॅथ्यूजने आधीच सांगितले आहे. पहिल्या सामन्यातून हे स्पष्टही झाले. असे असले तरी उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, माहेला जयवर्धने, कुमार संगकारा आणि स्वत: मॅथ्यूजसारख्या विपुल खेळाडूंमुळे लंकेची फलंदाजी कणखर आहे. शिवाय सूरज रणदिव, थिसारा परेरा आणि धम्मिका प्रसादसारखे मॅचविनर गोलंदाज पाहुण्यांकडे आहेत. श्रीलंकेची मदार मुख्यत: जयवर्धने आिण संगकारा या अनुभवी खेळाडूंवरच असेल.
संभाव्य संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, शिखर धवन, अंबाती रायडू, सुरेश रैना, रिद्धिमान साहा, रवींद्र जडेजा, आर.आश्विन, ईशांत शर्मा, उमेश यादव, स्टुअर्ट बिन्नी आणि धवल कुलकर्णी.
श्रीलंका : उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगकारा, माहेला जयवर्धने, ए. प्रियरंजन, ए. मॅथ्यूज (कर्णधार), तिसरा परेरा, एस. प्रसन्ना, धम्मिका प्रसाद, एन. कुलशेखरा, सूरज रणदिव किंवा एल. गमागे.