आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today Was Dr. Br Ambedkar And His People Enter The Amba Devi Mandir

...अन् उपेक्षितांसाठी खुली झाली ‘अंबादेवी’ची कवाडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - उपेक्षितांनान्याय मिळवून देण्यासाठी आजीवन संघर्ष करणारे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या मंदिर प्रवेशाच्या चळवळीला अमरावतीत यश मिळाल्याच्या घटनेला आज ८७ वर्षे पूर्ण होत आहेत.
अंबादेवी मंदिरात प्रवेश मिळावा, यासाठी तत्कालीन इंद्रभुवन थिएटरमध्ये १३ १४ नोव्हेंबर १९२७ रोजी परिषद झाली होती.

डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वात झालेल्या या चळवळीला डॉ. पंजाबराव देशमुख, पंढरीनाथ पाटील, आनंदराव चोबीतकर, नानासाहेब अमृतकर, बाबुराव चौबळ आदींचे मार्गदर्शन लाभले होते. दादासाहेब खापर्डे यांनीही याकामी पुढाकार घेतला. त्यानंतर या मान्यवरांनी तत्कालीन विश्वस्तांच्या मदतीने अंबादेवी मंदिराची कवाडे समाजातील प्रत्येक घटकासाठी खुली करून दिली होती.यानंतर अमरावतीत सामाजिक एकोप्याचा नवा अध्याय सुरू झाला. जो आजही कायम आहे. चळवळीनंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १५ नोव्हेंबर १९२७ रोजी मंदिराची कवाडे सर्वांसाठी खुली झाल्याचे सांगण्यात आले होते.
...समाजमहासंघाचा आनंदोत्सव
अंबादेवीमंदिर सर्व जाती-धर्मांसाठी खुले झाल्याच्या घटनेला शुक्रवारी ८७ वर्षे पूर्ण झाली. दादासाहेब खापर्डे यांच्या पुढाकारातून १४ नोव्हेंबर १९२७ रोजी हा निर्णय घेण्यात आला होता. या घटनेचा उपेक्षित समाज महासंघाने आनंदोत्सव साजरा केला. प्रा. श्रीकृष्ण बनसोड, रजिया सुलताना, श्रीकृष्ण माहोरे, हिंमत ऊईके आदींनी या वेळी मार्गदर्शन केले. विठ्ठल ढोकणे, राजेश तायडे, अय्युब खान, महम्मद सादिक, राजेश आडे, वसंतराव भडके, दिलीप गुलवाडे आदी उपस्थित होते. गुणवंत राऊत यांनी सूत्रसंचालन केले.

सामाजिक एकोप्याचा लिहिला नवा अध्याय
डॉ.आंबेडकर यांच्या नेतृत्वात मान्यवर मंडळी मंदिराच्या गेटपुढे आली होती. त्याचे छायाचित्रही उपलब्ध असल्याचे स्मरणात आहे. मंदिराच्या तत्कालीन विश्वस्तांनीही तत्काळ निर्णय घेऊन सर्वांना प्रवेश खुला केला. सर्वांनी एकमताने पुढाकार घेतल्याने सामाजिक एकोप्याचा नवा अध्याय अमरावतीमध्ये लिहिला गेला. जो आजही कायम आहे. डॉ.प्रदीप शिंगोरे, अध्यक्ष,अंबादेवी ट्रस्ट

प्रत्येक मनाची कवाडे व्हावी खुली
१९२७च्या चळवळीनिमित्त एक कार्यक्रमही नुकताच झाला. त्यात सहभाग घेतला. चळवळीनंतर धार्मिक स्थळांचे दरवाजे उपेक्षित समाजासाठी खुले झालेत. पण खैरलांजी, जवखेडसारख्या घटनांमुळे आजही पुरोगामी महाराष्ट्राची मान खाली जाते. त्यामुळे समाजातील प्रत्येकाच्या मनाची कवाडे खुली करणेही आता गरजेचे झाले आहे. रजियासुलताना, सामाजिक कार्यकर्त्या

शहराच्या इतिहासाच्या झरोक्यातून पाहताना
अंबादेवीमंदिराच्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख, दादासाहेब खापर्डे यांच्यासह मान्यवर मंडळी १४ नोव्हेंबर रोजी अंबादेवी मंदिराच्या गेटपुढे एकत्र जमले होते. ‘साऱ्यांनाच मंदिरात प्रवेशाचा हक्क आहे’, यावर चर्चा सुरू झाली. मंदिराच्या तत्कालीन विश्वस्तांनी ही मागणी रास्तच आहे, असे नमूद करीत मंदिरात आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार केला. त्यानंतर मंदिरात सर्वांनाच प्रवेश मिळेल, असे एकमताने ठरवण्यात आले आणि मंदिर प्रवेशाचा मार्ग प्रशस्त झाला.