Home »Sports »From The Field» Ton-Up Gautam Gambhir Leads From The Front Vs Australia

गंभीरचे निवड समितीला शतकाने चोख प्रत्युत्तर

वृत्तसंस्था | Feb 16, 2013, 23:31 PM IST

  • गंभीरचे निवड समितीला शतकाने चोख प्रत्युत्तर

चेन्नई- टीम इंडियातून बाहेर करण्यात आलेला सलामीवीर गौतम गंभीरने पाहुण्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीनदिवसीय सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी भारत अ संघाकडून खेळताना शानदार 112 धावांची खेळी केली. गंभीरने आपल्या शतकी खेळीने संघात पुनरागमनासाठी जोरदार दावेदारी केली आहे. गंभीरशिवाय रोहित शर्माने 77 आणि मनोज तिवारीने नाबाद 77 धावा काढल्या. तिवारीसोबत मुरलीधरन गौतम 34 धावांवर खेळत होता. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्या वेळी भारत अ संघाने 4 बाद 338 धावा काढल्या होत्या.


गुरुनानक कॉलेजच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात टॉस जिंकून गंभीरने प्रथम फलंदाजीचा योग्य निर्णय घेतला. भारत अ संघाच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. विशेषत: गौतम गंभीरने चमकदार फलंदाजी करून राष्‍ट्रीय संघातून वगळणा-या निवड समितीला चोख प्रत्युत्तर दिले. गंभीरने शानदार कव्हर ड्राइव्ह, स्क्वेअर कट, आकर्षक पूलचे फटके मारले. सलग सुमार फॉर्ममुळे कसोटी संघातून बाहेर करण्यात आलेल्या गंभीरसाठी हा सामना अत्यंत महत्त्वपूर्ण होता. त्याने मिळालेल्या संधीचा पूर्ण फायदा उचलताना आपल्या बॅटमध्ये अजूनही दम असल्याचे दाखवून दिले. गंभीरने एकाही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाला सोडले नाही. सर्व गोलंदाजांना बदडताना त्याने शतकी खेळी केली. मिशेल स्टार्क, पीटर सिडल, मोएसिस हेनरिक्स आणि नॅथन लॉयन त्याच्यावर कसलाच प्रभाव टाकू शकले नाहीत. गंभीरने दुस-या
विकेटसाठी रोहित शर्मासोबत 128 धावांची भागीदारी केली होती.

पुनरागमनासाठी दावेदारी
चेन्नईत शतक ठोकून गौतम गंभीरने टीम इंडियात पुनरागमनासाठी जोरदार दावेदारी सिद्ध केली आहे.

धावफलक
भारत अ धावा चेंडू 4 6
गंभीर झे.वॉटसन गो.हेनरिक्स 112 162 13 3
जीवन झे. वॉटसन गो. डोहर्ती 24 72 4 0
रोहित झे. वेड गो. डोहर्ती 77 144 8 3
मनोज तिवारी नाबाद 77 106 12 1
नायर झे. कोवान गो. डोहर्ती 4 5 1 0
एम. गौतम नाबाद 34 53 5 0
अवांतर : 10. एकूण : 90 षटकांत 4 बाद 338. गडी बाद होण्याचा क्रम : 1-67, 2-195, 3-266, 4-272. गोलंदाजी : स्टार्क 16-5-36-0, पीटर सिडल 14-4-30-0, हेनरिक्स 11-2-20-1, लॉयन 20-1-97-0, डोहर्ती 16-2-69-3, अगर 13-1-78-0.

Next Article

Recommended