आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tri Nation Series : India Again Fighting With Lanka

तिरंगी मालिका: भारत आज पुन्हा लंकेशी भिडणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोर्ट ऑफ स्पेन - तिरंगी मालिकेत पावसाचा व्यत्यय असलेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेला 81 धावांनी सहजपणे पराभूत करीत फायनलमध्ये प्रवेश केला. आता फायनलमध्ये गुरुवारी टीम इंडियाचा सामना पुन्हा श्रीलंकेशीच होणार आहे. तिरंगी मालिकेतील तिसरा यजमान संघ वेस्ट इंडीज स्पर्धेबाहेर झाला आहे. भारताने साखळीतील आपल्या अखेरच्या सामन्यात 3 बाद 119 धावा काढल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ अवघ्या 96 धावांत गारद झाला. सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमानुसार लागला.


भारत, श्रीलंका आणि वेस्ट इंडीज या तिन्ही संघांनी प्रत्येकी दोन विजय मिळवले. मात्र, नेट रनरेटमध्ये भारतीय संघ सर्वांत पुढे होता. भारताने बोनस गुणांसह 10 तर श्रीलंका आणि वेस्ट इंडीजचे प्रत्येकी 9 गुण होते. मात्र, लंकेने रनरेटच्या आधारे विंडीजला मागे टाकून गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले.


रोहितची चांगली फलंदाजी
श्रीलंकेचा कर्णधार अँग्लो मॅथ्यूजने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस बोलावले. पावसाचा व्यत्यय असलेल्या सामन्यात टीम इंडियाने 29 षटकांत 3 बाद 119 धावाच काढल्या. पावसामुळे सामना येथे थांबला. भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक नाबाद 48 धावा काढल्या. कर्णधार विराट कोहलीने 31 धावांचे योगदान दिले. सामना राखीव दिवशी खेळवला जाईल, असे वाटत होते. मात्र, दुपारनंतर परिस्थिती
सुधारली आणि श्रीलंकेसमोर डकवर्थ लुईस नियमाने 26 षटकांत 178 धावांचे लक्ष्य मिळाले.


सुमार फलंदाजी भोवली
भारताविरुद्ध अखेरच्या साखळी सामन्यात आमच्या फलंदाजांनी सुमार कामगिरी केली. यामुळेच आम्ही हरलो. आता फायनलमध्ये असे करून जमणार नाही. संघातील सर्व प्रमुख फलंदाजांनी जबाबदारी स्वीकारयला हवी.
अँग्लो मॅथ्यूज, कर्णधार, श्रीलंका.


संघाचा मला अभिमान
दोन सामन्यांत सलग पराभव झाल्यानंतर पुढचे दोन सामने सलग जिंकून पुनरागमन करणा-या संघाचा आत्मविश्वास दिसून येतो. अशा पुनरागमनामुळे अव्वलस्थानी राहणे, स्तुती करण्यासारखेच आहे. मला माझ्या संघाचा अभिमान आहे.
विराट कोहली, प्रभारी कर्णधार, टीम इंडिया.


भुवनेश्वरने कंबरडे मोडले
श्रीलंकेचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर अधिक वेळ टिकले नाहीत. श्रीलंकेचा संपूर्ण संघ 24.4 षटकांत 96 धावांत ढेपाळला. भारताकडून वेगवान गोलंदाज आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी भुवनेश्वरकुमार ठरला. भुवनेश्वरने 8 धावांत 4 गडी बाद केले. त्याने आपल्या स्विंग गोलंदाजीने विरोधकांना चांगलेच त्रस्त केले. रवींद्र जडेजा आणि ईशांत शर्मा यांनी प्रत्येकी दोन, तर उमेश यादव व आर. अश्विन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.


गुणतालिका
संघ सामने विजय पराभव गुण रनरेट
भारत 04 02 02 10 +0.054
श्रीलंका 04 02 02 09 +0.348
वेस्ट इंडीज 04 02 02 09 -0.383


शानदार खेळपट्टी
ही आतापर्यंतची सर्वाधिक शानदार खेळपट्टी होती. मी अशा विकेटवर चांगली कामगिरी करून आनंदी आहे. विजयात योगदान देऊ शकलो, याचाही आनंद आहे. - भुवनेश्वरकुमार.


फायनलमध्ये भारत-श्रीलंका समोरासमोर
श्रीलंकेला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश करणा-या टीम इंडियाचा सामना गुरुवारी पुन्हा श्रीलंकेशी होईल. फायनलमध्ये दमदार प्रदर्शन करून विजय मिळवण्याचा इरादा भारतीय खेळाडूंचा असेल.


फायनलमध्ये खेळू शकतो कॅप्टन कूल धोनी
कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी फायनलमध्ये खेळू शकतो. त्याने सरावास सुरुवात केली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात स्नायू दुखावल्यामुळे उर्वरित सामन्यात तो खेळू शकला नाही. धोनीच्या अनुपस्थितीत विराट कोहलीने नेतृत्व केले. मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध सामन्यापूर्वी टॉसच्या वेळी कोहलीने धोनीच्या तंदुरुस्तीबाबत माहिती दिली. तो वेगाने तंदुरुस्त होत असून, फायनलमध्ये तो खेळू शकतो, असे त्याने म्हटले.


भुवनने विक्रम मोडला
भुवनेश्वरकुमारने 8 धावांत 4 गडी बाद करून कॅरेबियन भूमीवर कोणत्याही भारतीय गोलंदाजाच्या सर्वश्रेष्ठचा नवा विक्रम केला. त्याने लेगस्पिनर अमित मिश्राच्या 31 धावांत 4 विकेटच्या विक्रमाला मागे टाकले. मिश्राने 8 जून 2011 मध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथे ही कामगिरी केली होती. भुवनने याच मैदानावर पराक्रम केला.