आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरंगी मालिका : श्रीलंकेविरुद्ध आज भारताला विजय आवश्यक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोर्ट ऑफ स्पेन - वेस्ट इंडीजवर जोरदार विजयानंतर उत्साहित टीम इंडियाच्या नजरा आता मंगळवारी तिरंगी मालिकेत श्रीलंकेविरुद्ध होणा-या सामन्यावर टिकून आहेत. या अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी भारताचा प्रयत्न असेल. या सामन्यात पराभव झाला तर टीम इंडिया स्पर्धेबाहेर होईल.


जखमी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जागी नेतृत्व करीत असलेल्या विराट कोहलीवर या सामन्यातही मोठ्या खेळीची जबाबदारी असेल. चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजेत्या टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला लागली असून, श्रीलंकेविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणे आवश्यक असल्याची जाणीव कोहलीला असेल. टीम इंडियाची आघाडीची फळी सध्या चांगली खेळत आहे. टॉप ऑर्डरमधील रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली धावा काढत आहेत. मात्र, मधल्या फळीत सुरेश रैना, दिनेश कार्तिक, मुरली विजय आणि रवींद्र जडेजा धावा काढण्यासाठी संघर्ष करीत आहेत.
श्रीलंकेने भारताविरुद्ध मागच्या सामन्यात 1 बाद 348 धावांचा डोंगर उभा केला होता. उपुल थरंगाने 174 आणि महेला जयवर्धनेने 107 धावा काढल्या होत्या. या स्कोअरमुळेच श्रीलंकेचा रनरेट सध्या प्लसमध्ये आहे.