ब्रिस्बेन - ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर
टीम इंडिया मंगळवारी इंग्लंडसोबत लढणार आहे. इंग्लंडनेसुद्धा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध गमावला. यामुळे दोन्ही संघ मालिकेत पहिल्या विजयासाठी या लढतीत एकमेकांशी झुंज देतील.
टीम इंडियाला या सामन्यात फलंदाज आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रांत सुधारणेची गरज आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित आणि रैना यांना वगळता इतर फलंदाजांनी नांग्या टाकल्या. गोलंदाजीत भुवनेश्वर आणि अक्षर यांनी कसून चेंडू टाकले. टीम इंडियाच्या इतर खेळाडूंची कामगिरी सरासरी ठरली. अशा परिस्थितीत कर्णधार महेंद्रसिंग धोनीला खेळाडूंचा विश्वास वाढवताना अधिक आक्रमक खेळ करावा लागेल. सलामीवीर शिखर धवनचा हरवलेला फॉर्म चिंतेची बाब आहे. दुसरीकडे कसोटीप्रमाणे विराट आणि रहाणे
आपला फॉर्म कायम ठेवतील, अशी आशा आहे. गोलंदाजीत उमेश यादव आणि मो. शमी यांना धावा रोखताना विकेटही घ्याव्या लागतील. इंग्लंडचा विचार केला तर पहिल्या सामन्यात संघाबाहेर असलेला जेम्स अँडरसन या लढतीत पुनरागमन करतोय. यामुळे स्टीव्हन फिन बाहेर जाऊ शकतो. इंग्लंडच्या फलंदाजी क्रमात बदलाची आशा नाही. मागच्या सामन्यात शतक ठोकणारा कर्णधार मोर्गन, मोईन अली, इयान बेल, जो. रूटमुळे त्यांची फलंदाजी भक्कम आहे. गोलंदाजीत त्यांच्याकडे अँडरसन, क्रिस वोग्स, जॉर्डन, ब्रॉड असे गोलंदाज आहेत. दोन्ही संघांसाठी टॉस महत्त्वाचा ठरेल.
सामन्याचे थेट प्रक्षेपण सकाळी ८.५० वाजेपासून दूरदर्शन आणि स्टार स्पोर्ट््स १, ३ वर
दोन्ही संघ असे
इंग्लंड : इयान मोर्गन (कर्णधार), इयान बेल, मोईन अली, जेम्स टेलर, जो. रुअ, रवी बोपरा, जोस बटलर, क्रिस वोग्स, क्रिस जॉर्डन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन.
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे,
विराट कोहली, सुरेश रैना, आर. अश्विन, अक्षर पटेल, भुवनेश्वर, मो. शमी, उमेश यादव, स्टुअर्ट बिन्नी.
सलामीवीर लयीत
आमचे सलामीवीर लयीत आहेत. इंग्लंडविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी आणि येथेसुद्धा वनडेत त्यांनी चांगली कामगिरी केली. मला इतिहासाची आकडेवारी माहिती नाही. मात्र, आमचे सलामीवीर चांगला खेळ करत आहेत. मी आमच्या सलामीवीरांच्या कामगिरीवर समाधानी आहे.
महेंद्रसिंग धोनी, कर्णधार, टीम इंडिया.
हेही आहे महत्त्वाचे
*मागच्या दोन वनडे मालिकांत (घरच्या मैदानावर आणि विदेशात अशा दोन्ही ठिकाणी) भारताने इंग्लंडला हरवले आहे. इंग्लंडविरुद्ध ही भारताच्या दृष्टीने उजवी बाजू आहे.
*इंग्लंड आणि भारत या दोन्ही संघांकडून वनडेत सर्वाधिक बळी घेण्याची कामगिरी जेम्स अँडरसनच्या नावे आहे. तो संघात परतल्याने सामन्याला कलाटणी मिळू शकते.