आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Twenty 20 World Cup News In Marathi, Bangladesh, Divya Marathi

बांगलादेशात 16 मार्चपासून ट्वेंटी-20 विश्वचषक होणार सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बांगलादेशात येत्या 16 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत होणा-या आयसीसी ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने आठ संघांपैकी पहिल्या चार क्रमांकांच्या संघांमध्ये अव्वल स्थानासाठी जबरदस्त संघर्ष होणार आहे. श्रीलंका (129), भारत (123), दक्षिण आफ्रिका (123) आणि पाकिस्तान (121) या पहिल्या चार संघांमध्ये गुणांचा फारसा फरक नाही. त्यापैकी दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांची मालिका जिंकून विश्वचषकाआधीच आपल्या गुण संख्येत भर घालण्याची संधी आहे.


विंडीज संघ इंग्लंडविरुद्ध 3 सामन्यांच्या मालिकेत दोन हात करून आपली गुणसंख्या 111 वरून आणखी वाढवू शकतो. त्यांच्याखाली असलेल्या ऑस्ट्रेलियालाही विजय मिळवून सहाव्या क्रमांकावर उडी मारता येईल. मात्र, विश्वचषक स्पर्धेच्या 6 सामन्यांच्या निकालांनंतर गुणतक्त्यात प्रचंड उलथापालथ होण्याची शक्यता आहे. आठव्या क्रमांकावर असलेला इंग्लंड संघ आणि सहाव्या क्रमांकावर असलेला ऑस्ट्रेलियन संघ या दोन बलाढ्य संघांना विश्वचषकाच्या निमित्ताने आपले रँकिंग उंचावण्याची नामी संधी चालून आली आहे.


अ‍ॅलेक्स हेल्स (2), अ‍ॅरोन फिंच (3), शेन वॉटसन (8), डेव्हिड वॉर्नर (9) हे पहिल्या 10 क्रमवारीतील फलंदाज स्पर्धेत आपली कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न करतील. जे. पी. ड्युमिनी (12), ख्रिस गेल (16), डू प्लेसिस (17), मार्लन सॅम्युअल्स (20) कॅमरून व्हाइट (25), जॉर्ज बेली (29), ड्वेन ब्राव्हो (30), ल्युक राइट (36), ए. बी. डिव्हिलियर्स (38), हशीम अमला (40) यांच्याकडूनही दर्जेदार खेळाची अपेक्षा करण्यात येत आहे.


गोलंदाजांमध्ये रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेला विंडीजचा सुनील नरेन, लोनावोबो त्सोत्सोबे (7) हे टॉप टेनमधील गोलंदाज 9 मार्चला होणा-या आपापल्या देशाच्या ट्वेन्टी-20 सामन्यांत खेळताना पाहावयास मिळतील.
स्ट्युअर्ट ब्रॉड (13), सॅम्युअल बद्री (15), जेड डेर्नाब (19), शेन वॉटसन (25), मायकल स्टार्क (26), डॅरेन सॅमी (27), मॉर्ने मॉर्केल (30), टिम ब्रेसनन यांना गोलंदाजीतील ट्वेन्टी-20 रँकिंग उंचावण्याची संधी आहे.


‘सुपर टेन’मध्ये विभागणी
गट - 1 श्रीलंका, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड व पहिल्या फेरीतून आलेला एक संघ.
गट - 2 वेस्ट इंडीज, भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया व पहिल्या फेरीतून आलेला एक संघ.


23 मार्चला भारताचा सामना
गतविजेत्या वेस्ट इंडीजची सलामीची लढत भारताविरुद्ध 23 मार्चला होईल. त्याच दिवशी पाकिस्तान, ऑस्ट्रेलियाशी दोन हात करेल. बांगलादेशने सुपर टेनमध्ये प्रवेश केला, तर त्यांना ढाक्यात 25 मार्चला विंडीजशी सामना करावा लागेल, नंतर भारताशी 28 मार्चला व पाकिस्तानशी 30 मार्चला व ऑस्ट्रेलियाबरोबर 1 एप्रिलला दोन हात करावे लागतील.