आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Wrestlers Bend Knee Before Pandharpur's Vitthal

पंढरीच्या ‘विठ्ठला’पुढे पाच मल्लांचे लोटांगण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भोसरीत (पुणे) सुरू झालेल्या राज्य कुस्ती आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पध्रेत माती प्रकारात 66 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक करणार्‍या पंढरपूरच्या विठ्ठल महादेव कुसुमडेने पहिल्याच दिवशी पाच मल्लांना अस्मान दाखवत अंतिम फेरीत धडक मारली. यंदा पहिल्यांदाच मॅटवर खेळताना सलग चौथ्यांदा सुवर्णपदक पटकावण्यासाठी सज्ज असलेल्या विठ्ठलसमोर सोमवारी पिंपरी- चिंचवडच्या संदेश काकडेचे आव्हान आहे. 66 किलोच्या माती प्रकारात सोलापूरचा मल्ल आबा मदनेने परभणीच्या एकनाथ खैरेला मोळी डावावर चीतपट करत स्पध्रेच्या पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे.
पै. किसनराव लांडगे यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्पध्रेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांच्या हस्ते ‘कुस्तीची पंढरी भोसरी-भोजापूर’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. याप्रसंगी भारतीय कुस्ती महासंघाचे सचिव राजसिंग, राज्य कुस्तीगिरी परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर राजू मिसाळ, ज्ञानेश्वर लांगडे, रुस्तम-ए-हिंद दादू चौगुले, नामदेव मोहिते, विलास कथुरे, महेश लांडगे यांची उपस्थिती होती.
उपमुख्यमंत्री अजित पवारांची आश्वासने
* राज्य सरकार खेळाडूंसाठी भरपूर सवलती देत आहे. खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून सराव करावा.
* पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 10 ते 12 कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात येईल.
* कुस्तीसह सर्वच खेळांना प्रोत्साहन मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाकडून भक्कम आर्थिक पाठबळ दिले जाईल.