आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट मैदानावर ‘पंचगिरी’चे महत्त्व अधोरेखित करणारे पुस्तक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- क्रिकेटच्या मैदानावरील उपेक्षित असलेली तीन क्षेत्रे म्हणजे यष्टिरक्षण, क्षेत्ररक्षण आणि पंचगिरी असल्याचे लेखकाला वाटते. अचूक पंचगिरीशिवाय मैदानावरील क्रिकेटचे पावित्र्य टिकणे अशक्य आहे. मैदानावरील अंपायर हा पंचगिरीचे आपले काम करीतच असतो, शिवाय तो खेळाला सर्वात जवळून पाहणारा प्रेक्षक आणि खेळाला नियंत्रित करणारा अधिकारीसुद्धा असतो. लेखकाने पुस्तकात पंचाचे कार्य, मेहनत आणि त्यांचे महत्त्व इत्थंभूत माहिती देऊन अधोरेखित केले आहे.

पंचगिरीचे महत्त्व सांगताना लेखकाने डॉ. ग्रेस यांची दिलेली माहिती आणि विकेटकीपरला रागवताना त्यांचे वाक्य क्रिकेटच्या मैदानावरील किस्सा अप्रतिम असाच आहे. जवळपास 135 वर्षांपूर्वी म्हणजे 1877 मध्ये पहिल्यांदा एका कसोटीत दोन पंच मैदानात आले होते. कोसाष्टिक आणि करटिस रीड हे दोघे कसोटीतील पहिले पंच ठरले. दोघेही आॅस्ट्रेलियाचे होते. सुरुवातीला पंचगिरीच्या कार्यात कोणीही विशेष रस घेत नव्हते. पुढे चालून या खेळातील खेळाडू खेळाशी जुळून राहण्यासाठी पंचगिरी, समालोचन, क्रिकेट प्रशासन आणि प्रशिक्षणात रस घेऊ लागले. हे सर्व 20 व्या शतकापासून सुरू झाले.

डॉ. ग्रेस यांच्याप्रमाणेच पतियाळाचे महाराजासुद्धा आपल्या मर्जीने खेळत असे. ते फलंदाजी करीत असताना क्षेत्ररक्षक चेंडूला अडवण्याऐवजी पायाने ढकलून त्याला सीमारेषेबाहेर करायचे. हे सर्व स्थानिक क्रिकेटमध्ये होत असे. जसजसे पंचाचे महत्त्व वाढले त्यानुसार काळानुरूप असे प्रकार कमी होत गेले. राजस्थानने रणजीचे विजेतेपद मिळवण्यासाठी दिग्गज खेळाडूंना कसे एकत्र केले आणि पंचांनाही मॅनेज करण्याचा केलेला प्रयत्न कसा फसवा ठरला ही माहितीसुद्धा ज्ञानात भर घालते.

रंजक माहिती- लेखकाने पुस्तकात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि झिम्बाब्वे देशातील पंच आणि पंचगिरीची रंजक माहिती दिली. लेखकाने पुस्तकात आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या अचूक पंचगिरीने मैदान गाजवणा-या 23 पंचांची माहिती दिली आहे.

नावाजलेल्या पंचांची वाचनीय माहिती - लेखकाने पुस्तकात डॅरेल हेयर, डॅरिल हार्पर, सायमन टफेल, फ्रेंच चेस्टर, हेरॉल्ड ‘डिकी’बर्ड, डेव्हिड शेफर्ड, चार्ली इलियट, डेव्हिड कॉस्टेंट, स्टीव्हन डन, बिली बाऊडेन, रुडी कर्टसन, डेव्हिड आॅर्चर्ड, डगलस सेंग ह्यू, स्टीव्ह बकनर, बिली डिक्ट्रोव्ह, श्रीनिवासराघवन वेंकटराघवन, व्ही. के. रामास्वामी, खिजर हयात, आलम दार, असद रऊफ, के. टी. फ्रान्सिस, अशोक डिसिल्व्हा, रसेल टिफिन या जगभरातील आघाडीच्या पंचांची पंचगिरीची शैली, माहिती आणि विशेषत: याबाबत सविस्तर विश्लेषण केले आहे. याशिवाय या पंचांच्या आयुष्यातील वैयक्तिक माहिती, अडचणींवर मात करून त्यांनी कसे आपले काम चोखपणे बजावले हेसुद्धा सांगण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे.