आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा: विजय झोलच्या नेतृत्वात भारताने केली कांगारूंची शिकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डरविन - सलामीवीर अंकुश बैस (64), कर्णधार विजय झोलची (46) शानदार फलंदाजी आणि डावखुरा वेगवान गोलंदाज कुलदीप यादवच्या (19 धावांत 3 विकेट) धारदार गोलंदाजीच्या बळावर भारताने 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला 47 धावांनी हरवले. ट्राय यूथ वनडे क्रिकेट स्पर्धेत भारताचा हा पहिला सामना होता. आता भारताचा पुढचा सामना गुरुवारी न्यूझीलंडसोबत होईल.


भारतीय संघाने 49.3 षटकांत 231 धावांचा स्कोअर काढल्यानंतर ऑस्ट्रेलियाला 47.1 षटकांत 174 धावांत रोखले. भारताला या विजयानंतर 4 गुण मिळाले. बैसला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर भारताने चांगली फलंदाजी केली. भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी धावा जमवल्या. बैसने 100 चेंडूंत 1 षटकार आणि 5 चौकारांच्या साह्याने 64 धावा काढल्या. अखिल हरवेदकरने 41 चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 25 धावा काढल्या. जालन्याचा गुणवंत खेळाडू विजय झोलने 63 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार मारले. विजय झोलने 46 धावांचे योगदान दिले. आयपीएल-6 मध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणा-या संजू सॅमसनने 37 चेंडूंत दोन चौकारांसह 34 धावा आणि दीपक हुड्डाने 24 चेंडूंत 22 धावा काढल्या. ऑस्ट्रेलियाकडून कॅमरून वेलेंटने 39 धावांत 3 विकेट, गेब बेलने 34 धावांत 3 विकेट आणि मॅथ्यू केलीने 45 धावांत दोघांना बाद केले. मॅथ्यू फोतियाने 46 धावांत दोन गडी टिपले.


ऑस्ट्रेलियाकडून यष्टिरक्षक बेन मॅकडरमॉटने सर्वाधिक 50 धावांचे योगदान दिले. त्याच्याशिवाय मॅथ्यू शॉटने 30 धावा, डॅमियन मोटिंमरने 28 धावा आणि कर्णधार जॅक डोरानने 21 धावा काढल्या. ऑस्ट्रेलियाचे अखेरचे सहा फलंदाज अवघ्या 19 धावांत बाद झाले. कुलदीप यादवने तीन विकेट घेतल्या. अभिमन्यू लांबा, चामा मिलिंद, अतुलसिंग हुड्डा आणि सरफराज खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.


संक्षिप्त धावफलक
भारत : 221 धावा. (अंकुश बैस 64, विजय झोल 46, संजू सॅमसन 34, 3/39 कॅमरून वेलेंट, 3/34 गेब बेल), ऑस्ट्रेलिया : 174. (बेन मॅकडरमॉट 50, मॅथ्यू शॉट 30, डॅमियन मोंटियर 28, 3/19 कुलदीप यादव).