आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

19 वर्षांखालील विश्वचषक : भारतीय युवा संघ पाचव्या स्थानी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई - संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली भारताच्या युवा संघाने आयसीसी 19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाचवे स्थान पटकावले. भारतीय संघाने सोमवारी श्रीलंकेचा 76 धावांनी पराभव केला. सामनावीर दीपक हुडाच्या (76 धावा, 3 विकेट) अष्टपैलू कामगिरीच्या बळावर भारताने सामना जिंकला. यात र्शेयस अय्यरने (59) शानदार अर्धशतकाचे योगदान दिले.

प्रथम फलंदाजी करताना भारताने 7 गड्यांच्या मोबदल्यात 291 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 48.1 षटकांत अवघ्या 215 धावांत गाशा गुंडाळला. या पराभवासह श्रीलंका टीमला स्पर्धेत सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

धावांचा पाठलाग करणार्‍या श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर डुमिंडू (2) स्वस्तात बाद होऊन तंबूत परतला. त्यानंतर समरविक्रमा (58) आणि कर्णधार मेंडिसने (14) दुसर्‍या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी करताना संघाचा डाव सावरला. दरम्यान, हुडाने मेंडिसला बाद करून ही जोडी फोडली. चौथ्या क्रमांकावर आलेल्या परेराने 47, रामनायकेने 27 धावांचे योगदान दिले. मात्र, लंकेला 215 धावांपर्यंत मजल मारता आली. गोलंदाजीत दीपकने दहा षटकांत 31 धावा देत तीन विकेट घेतल्या. चामा मिलिंद, करन कौला आणि कुलदीप यादवने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

तत्पूर्वी, अंकुश बैन्स (29) आणि अखिल हेरवाडकर (23) यांनी भारताला 57 धावांच्या भागीदारीची सलामी दिली. तसेच विजय झोलच्या अनुपस्थितीत संजू सॅमसनने सामन्यात संघाचे यशस्वीपणे नेतृत्व केले. याशिवाय त्याने संघाला 40 धावांचे योगदान दिले. त्यापाठोपाठ दीपक हुडाने अर्धशतकी खेळी करून भारतीय संघाला सामन्यात सन्मानजनक धावसंख्या उभी करून दिली. त्याने 56 चेंडूंचा सामना करताना सात चौकार आणि चार षटाकारांसह संघाकडून सर्वाधिक 76 धावा काढल्या. गोलंदाजीत श्रीलंका टीमकडून रामनायके, फर्नांडो आणि टायरोनने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक
भारत : 7 बाद 291 धावा (हेरवाडकर 23 ,र्शेयस अय्यर 59, सॅमसन 40, दीपक 76, 2/46 रामनायके, 2/79 फर्नांडो) श्रीलंका : सर्वबाद 215 (समरविक्रमा 58, परेरा 47, लक्षण नाबाद 25, 3/31 हुडा, 2/39 करण, 2/29 मिलिंद, 2/54 कुलदीप.)