आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन ओपन टेनिस: रॉजर फेडररला धक्‍का

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - स्विसकिंगचा महिमा संपला. अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत लाखो चाहत्यांच्या गळ्यातला ताईत असलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररचा धक्कादायक पराभव झाला. स्पेनच्या खेळाडूचा पुन्हा त्याच्यासमोर अडथळा ठरला. या वेळी 19 वा मानांकित टॉमी रॉबरेडोने सातवा मानांकित फेडररला तीन सेटमध्ये हरवले. दुसरीकडे राफेल नदालने हार्डकोर्टवर 19 वा विजय मिळवत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.


आता नदालचा सामना रॉबरेडोशी
बारा ग्रँडस्लॅम विजेता खेळाडू स्पेनच्या राफेल नदालनेही विजयी लय कायम ठेवली. नदालने जर्मनीच्या फिलिप कोलश्वेबरला पराभूत केले. दुसरा मानांकित नदालने 22 वा मानांकित कोलश्वेबरला 6-7 (4/7), 6-4, 6-3, 6-1 ने मात दिली. या सत्रात नऊ एटीपी विजेतेपदे जिंकून नदाल जबरदस्त फॉर्मात आहे. मागच्या सात महिन्यांत नदालच्या विजयाचा रेकॉर्ड 56-3 असा जबरदस्त राहिला आहे. आता नदालचा सामना फेडररला पराभूत करणा-या आपल्याच देशाच्या टॉमी रॉबरेडोशी होईल. रॉबरेडोविरुद्ध नदालने आतापर्यंत यापूर्वी सर्व सहा सामन्यांत विजय मिळवला होता. ‘फेडररला पराभूत करून रॉबरेडो पुढे आला आहे. या विजयामुळे त्याचा आत्मविश्वास बुलंदीवर आहे. त्याला पराभूत करणे सोपे नाही. हा सामना कठीण असेल,’ अशी प्रतिक्रिया सामन्यानंतर नदालने व्यक्त केली.


गास्केट, राओनिकने मारली बाजी
पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत आणखी एका सामन्यात फ्रान्सच्या रिचर्ड गास्केटने कॅनडाच्या एम. राओनिकला 7-6, 6-7, 6-2, 6-7, 7-5 ने हरवले. हा सामना तब्बल चार तास आणि 40 मिनिटे इतका चालला. या मॅरेथॉन लढतीत कॅनडाच्या राओनिकने तब्बल 39 ऐस मारले. मात्र, त्याचा पराभव झाला. स्पेनच्या डेव्हिड फेररने इतर एका लढतीत सर्बियाच्या जांको टिप्सेरेविचला 7-6, 6-3, 7-5, 7-6 ने मात दिली. आता फेररचा सामना रिचर्ड गास्केटशी होईल.


हंचुकोवा, पेनेटा, विन्सी विजयी
महिला गटात स्लोवाकियाची डॅनियला हंचुकोवा, इटलीची एफ. पेनेटा आणि इटलीच्या रॉबर्टो विन्सी या खेळाडूंनी चौथ्या फेरीतील आपापले सामने जिंकून आगेकूच केली. दहावी मानांकित विन्सीने कॅमिला जिओर्गीला 6-4, 6-2 ने पराभूत केले. पेनेटाने 21 वी मानांकित रोमानियाच्या सिमोना हालेपला 6-2, 7-6 ने हरवत अंतिम आठमध्ये प्रवेश केला.हंचुकोवाने 2002 नंतर शानदार कामगिरी करताना अकरा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.