आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन ओपन टेनिस: नदालची ‘विजयी एक्स्प्रेस’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - जगातला दुस-या क्रमांकाचा खेळाडू राफेल नदालने अव्वल मानांकित सर्बियाच्या नोवाक योकोविकला 6-2, 3-6, 6-4, 6-1 ने पराभूत करून अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा दुस-यांदा जिंकण्याचा पराक्रम नदालने केला. यापूर्वी तो येथे 2010 मध्ये विजेता आणि 2011 मध्ये उपविजेता ठरला होता. फायनलमध्ये त्याने सहजपणे योकोविकवर 3-1 ने बाजी मारली. वर्षातील हे त्याचे दुसरे ग्रँडस्लॅम ठरले. यापूर्वी त्याने या वर्षी फ्रेंच ओपनचे जेतेपद मिळवले होते.


या विजयानंतर आता नदालच्या नावे 13 ग्रँडस्लॅम किताब झाले आहेत. तो आता रॉजर फेडरर (17 ग्रँडस्लॅम) आणि पीट सॅम्प्रास (14 ग्रँडस्लॅम) यांच्यानंतर तिस-या क्रमांकावर पोहोचला आहे. या शानदार रेकॉर्डमुळे नदाल हार्डकोर्टचा बादशहा ठरला आहे. या सत्रात हार्डकोर्टवर त्याच्या विजयाची सरासरी तब्बल 22-0 अशी ठरली आहे. तर त्याचा ओव्हर ऑल मॅच रेकॉर्ड 60-3 असा आहे.


पहिला सेट नदालच्या नावे
वेगवान वारे सुरू असताना पहिला सेट नदालने 42 मिनिटांत जिंकला. पहिल्या सेटमध्ये स्पॅनिश खेळाडूने अवघ्या चार चुका केल्या, तर सर्बियाच्या खेळाडूने तब्बल 14 चुका करून सेट गमावला.


दुसरा सेट योकोविकने जिंकला
अव्वल मानांकित योकोविकला सामन्यात पुनरागमन करण्यासाठी वेळ लागला नाही. त्याने दुसरा सेट 6-3 ने जिंकला. योकोविकने दुस-या सेटच्या सहाव्या गेममध्ये नदालची सर्व्हिस मोडून 4-2 अशी आघाडी घेतली. यानंतर नदालने योकोविकची सर्व्हिस मोडून 4-3 असा स्कोअर केला. पुढच्या गेममध्ये योकोविकने बॅकहँड क्रॉसकोर्ट विनर मारत नदालची सर्व्हिस मोडली आणि सेट आपल्या नावे केला.


नदालची आघाडी
तिस-या सेटच्या ओपनिंग गेममध्ये योकोविकने सलग तीन ब्रेकसह 3-0 अशी आघाडी घेतली. नदालने सहाव्या गेममध्ये योकोविकची सर्व्हिस मोडून 3-3 अशी बरोबरी केली. तिस-या सेटमध्ये 125 किमी वेगाने सर्व्हिस करून नदालने योकोविकला चकित केले. पुढच्या गेममध्ये योकोविकची सर्व्हिस ब्रेक करताना नदालने हा सेट जिंकला. चौथ्या सेटमध्ये नदालने योकोविकची सर्व्हिस ब्रेक करून 2-0 अशी आघाडी घेतली. नदालच्या शानदार स्ट्रोक्सपुढे योकोविक संघर्ष करीत होता. नदालने पुन्हा योकोविकची सर्व्हिस मोडून 5-1 अशी मजबूत आघाडी मिळवली. यानंतर शानदार सर्व्हिससह त्याने सेट आणि सामना आपल्या नावे केला.


हेही आहे महत्त्वाचे !
36
लाख डॉलरचे बक्षीस जिंकले
3-1
ने योकोविकला हरवले
13 वे ग्रँडस्लॅम नदालने जिंकले


तब्बल 10 लाख डॉलरचे बोनस
यूएस ओपनचे विजेतेपद मिळवल्यानंतर नदालला 26 लाख डॉलरचे बक्षीस मिळाले. याशिवाय त्याला अव्वल स्थान गाठल्यामुळे दहा लाख डॉलरचे अतिरिक्त बोनस देण्यात आले. फायनल विजयानंतर नदालवर जणू काही बक्षिसांचा पाऊस झाला.


आतापर्यंत 37 वेळा समोरासमोर
जगातल्या या दोन अव्वल खेळाडूंत आतापर्यंत 37 वेळा सामना झाला. यात नदालने 22 वेळा, तर योकोविकने 15 वेळा विजय मिळवला. यापूर्वी हे रेकॉर्ड जॉन मॅकन्रो आणि इवान लेंडल यांच्यात होता. त्या दोघांत 36 वेळा सामना झाला. यात नदालच अधिक वरचढ ठरला.


फायनलमधील आकडेवारी
आकडेवारी नदाल योकोविक
पहिल्या सर्व्हिसवर गुण 65 % 58%
दुस-या सर्व्हिसवर गुण 56% 48%
वेगवान सर्व्हिस 125 एमपीएच 127 एमपीएच
पहिल्या सर्व्हिसचा वेग 110 एमपीएच 112 एमपीएच
नेट गुण 74% 61%
ब्रेक गुण 58% 27%
विनर 27 47
साध्या चुका 20 53
एकूण गुण 121 102


विजय खास
योकोविकविरुद्ध खेळणे आणि जिंकणे नेहमीच खास असते. नोवाक असा खेळाडू आहे, ज्यामुळे माझ्या खेळाचा दर्जा उंचावण्यास मदत होते.
राफेल नदाल


नदालच हक्कदार
नदालने कमाल कामगिरी केली. तो प्रत्येक परिस्थितीत या ट्रॉफी आणि विजयाचा हक्कदार आहे. त्याने माझ्यापेक्षा सरस खेळ केला.
नोवाक योकोविक.