आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लंडन आय : ‘थंडर’ बोल्ट !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंगमध्ये चार वर्षांपूर्वी बर्ड्स नेस्टमध्ये आलेले युसेन बोल्ट नावाचे वादळ काल, रविवारी लंडनच्या ऑलिम्पिक पार्कमध्ये अवतरले. योहान ब्लेक, जस्टिन गॅरलीन, असाफा पॉवेल, टायसन गे हे सारे विद्यमान वेगवान धावपटू या वादळाच्या तडाख्याने नेस्तनाबूत झाले. युसेन बोल्ट पुन्हा एकदा वेगवान मानव ठरला.
ग्रीसमधील प्राचीन ऑलिम्पिकपासून आजवर मानवाला वेगाचे वेड कायम आहे. मानवी र्मयादांच्या परिसीमा वाढवणारा युसेन जेट युगातील मानवाच्या प्रगतीचे प्रतीक आहे. 100 मीटर्स अंतर माणसाला 10 सेकंदांपेक्षा कमी वेळेत पार करता येईल हे एकेकाळी शक्य वाटत नव्हते. रविवारी 100 मीटर्स शर्यतीसाठी पात्र ठरलेल्या पहिल्या सात धावपटूंनी 10 सेकंदांपेक्षा कमी वेळ नोंदवली. बीजिंगला अंतिम रेषेवर पोहोचण्याआधीच 10 मीटर्सचे अंतर युसेन बोल्ट कमी वेगात धावला. कारण त्याच्याशी स्पर्धा करायला कुणीच नव्हते.
लंडनमध्ये मात्र तसे झाले नाही. उपान्त्य फेरीत 9.87 सेकंदांची वेळ नोंदवताना त्याने पुन्हा एकदा मागे वळून पाहिले. अंतिम फेरीत मात्र या वेळी त्याला जबरदस्त स्पर्धा होती. मान वळवून आजूबाजूला पाहणे त्याला परवडणारे नव्हते. सहकारी योहान ब्लेकने त्याला आपल्या देशाच्या चाचणीतच धूळ चारली होती. अमेरिकेचा गॅटलिन, टायसन गे यांची दुसरीकडे दर्पोक्ती सुरू होती की, बोल्टमध्ये पूर्वीचा वेग राहिलेला नाही. प्रसिद्धी माध्यमांनी ‘बोल्ट संपला’ असे मथळे द्यायला सुरुवात केली होती. दोन महिन्यांपूर्वीचा माहोल होताच तसा. जमैकामध्ये झालेला ‘कार’चा अपघात, मध्येच उद्भवलेली पाठदुखीची समस्या आणि जमैकन ऑलिम्पिक चाचणीत योहान ब्लेककडून स्वीकारलेली हार.
100 मीटर्स शर्यतीचा ‘ताज’ युसेनच्या डोक्यावरून या वेळी खाली उतरणार, असेच सर्वांना वाटत होते. युसेनच्या बाजूच्या काही गोष्टीही होत्या. लंडनचा ट्रॅक वेगवान होता. हवामान अनुकूल होते. आणि युसेनकडे अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करणार्‍या कृष्णासारखा गुरूहोता. त्याने युसेनच्या डोक्यातील शंकांचे मळभ दूर केले. युसेनची आतापर्यंतची सारी मिळकत त्याच्या खराब स्टार्टनंतरही मिळालेली होती. युसेनच्या चांगल्या स्टार्टवरील प्रशिक्षकांनी घेतलेली मेहनत लंडनमध्ये कामी आली. लंडनमध्ये सर्व स्पर्धकांसोबत युसेनचा स्टार्ट झाला. 1 ते 40 मीटर्स अंतरादरम्यान त्याला नेहमीच धडपडावे लागले. रविवारी तसे झाले नाही. 40 मीटर्सपुढच्या टप्प्यातच त्याने इतरांच्या पुढे झेप घेतली. 60 मीटरनंतर तो इतरांपेक्षा खूपच पुढे होता. या वेळी मात्र त्याने मागे वळून पाहण्याचे धाडस केले नाही. त्यामुळे बीजिंगमध्ये नोंदवलेला स्वत:चाच ऑलिम्पिक विक्रम त्याला लंडनमध्ये मोडता आला. त्याने वेगाची र्मयादा आणखी पुढे नेण्याचे लक्ष्य स्वत:पुढे ठेवले आहे. 9.4 सेकंदांत 100 मीटर्स त्याला पार करायचे आहेत. स्टार्ट चांगला झाला, हवेचे आणि वातावरणाचे पाठबळ मिळाले, तर तेही शक्य होईल.
पण त्याचा तो फारसा विचार करत नाही. गेले दोन महिने गॅटलिनपासून प्रसिद्धी माध्यमांनी त्याचे खच्चीकरण केल्यानंतरही तो कधीच हादरला नाही. खास जमैकन बेदरकार वृत्ती त्याच्या रक्तात आहे. आपल्या हितशत्रूंची नावे घेत घेत तो विजयानंतर प्रतिक्रिया देत होता. जमैकन ‘रम’सारखा त्याचा स्वभाव आहे. जमैकन ‘रमणीं’मध्ये फारसा न गुंतलेला युसेन मिश्कील व विनोदी स्वभावाचा आहे. त्याला विषारी आफ्रिकन मुंग्यांची फारच भीती वाटते. खोलवर पाण्यात पोहायला तो घाबरतो. पण हातात बॅट असली की ख्रिस गेलच्या गोलंदाजीवर षटकार मारतो आणि गोलंदाजी करताना गेलचा त्रिफळाही उडवतो. जमैकन लोकांची क्रिकेटची आवड त्याने विरंगुळा म्हणून जपली आहे. पुन्हा एकदा वेगवान मानव ठरल्यानंतरही त्याच्या चेहर्‍यावर दडपण दूर झाल्याचे भाव दिसत नव्हते. उलट तो थट्टामस्करी करतच प्रश्नांची उत्तरे देत होता. कुणाच्या पार्श्वभागावर चापटी मार, कुणाच्या गळ्यात पड, असे उद्योग सुरू होते. सहजता हा त्याच्या स्वभावाचा जमैकन स्थायीभाव आहे. ज्या सहजतेने तो ट्रॅकवर धावतो, त्याच सहजतेने यश, कीर्ती, वैभवही पचवतो.