ग्लासगो - जगातील सर्वात वेगवान धावपटू बोल्टने जमैका संघाला राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले. जमैकाच्या संघाने 4 बाय 100 रिलेत हे सोनेरी यश संपादन केले. या संघाने 37.58 सेकंदांत निश्चित अंतर पूर्ण केले. तसेच सुवर्णपदकासह जमैकाने स्पर्धेत नव्या विक्रमाचीही नोंद केली.
बोल्टपाठोपाठ केमार बेली, निकेल एश्मिड आणि जेसन लिवरमोर यांनीही जमैकाच्या सोनेरी कामगिरीत मोलाचे योगदान दिले. या रिलेच्या सर्वात शेवटी बोल्टने धाव घेऊन संघाचे सुवर्णपदक निश्चित केले.
यासह सहा वेळच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या आणि आठ वेळचा वर्ल्ड चॅम्पियन बोल्टने पहिल्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेतील आपला सहभाग सुवर्णाक्षरांनी लिहिला. पायाच्या दुखापतीमुळेच बोल्टने 100 आणि 200 मीटर धावणाच्या शर्यतीत सहभाग घेतला नव्हता. आतापर्यंत करिअरमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेतील मेडलची उणीव भासत होती. आता तीदेखील पूर्ण झाली, असे बोल्ट म्हणाला.
तीन वर्षांनंतर बोल्टची निवृत्ती
जगातील ‘सुपरफास्ट जमैकन एक्स्प्रेस’ बोल्टने 2017 मध्ये निवृत्ती घेण्याचे संकेत दिले. यादरम्यान होणार्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेतील सुवर्ण कामगिरीनंतर तो निवृत्तीच्या निर्णयाचा विचार करणार आहे.