लंडन - जमैकाचा वेगवान धावपटू युसेन बोल्टला आता 200 मीटरच्या शर्यतीत नवा रेकॉर्ड करायचा आहे. त्याला ही शर्यत आता 19 सेकंदांपेक्षाही कमी वेळात जिंकायची आहे. मुळात आता 100 आणि 200 मीटरचा विक्रम त्याच्याच नावे आहे. बोल्टने पाच वर्षांपूर्वी बर्लिन येथे 200 मीटरची शर्यत 19.19 सेकंदांत जिंकून वर्ल्ड रेकॉर्ड केला होता.
‘हा रेकॉर्ड मोडला जाणे शक्य आहे. यात कोण केव्हा पुढे येईल, कोणीही सांगू शकत नाही. निश्चितपणे मीसुद्धा यासाठी कठोर मेहनत करीत आहे. पुढे काय होईल, बघूया,’ अशी प्रतिक्रिया बोल्टने व्यक्त केली.
ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये बोल्टने 4 गुणे 400 मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक जिंकले. ‘कॉमनवेल्थ गेम्समध्ये ही माझी पहिली आणि अखेरची स्पर्धा होती. रिओ ऑलिम्पिकनंतर मला निवृत्त व्हायचे आहे, असे मी नेहमीच म्हटले आहे. मात्र, मी 2017 च्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये सहभागी व्हावे असा माझ्या चाहत्यांचा आग्रह आहे. बहुधा मी त्यात सहभागी होईन. करिअरमध्ये टॉपवर असताना निवृत्ती का घेतोय, असे मला मायकेल जॉन्सनने एकदा विचारले होते. मी म्हणालो, आता मला मिळवण्यासारखे वेगळे असे काहीच नाही. माझ्या खेळात मी सर्वकाही मिळवले आहे, असे मला वाटते. खेळात आपण सर्वकाही जिंकले असताना निवृत्ती घेतली पाहिजे, ’ असे बोल्ट म्हणाला. बोल्टने राष्ट्रकुल स्पर्धेच्या रिलेत सुवर्णपदकाची कमाई केली. यासह त्याने आपल्या करिअरच्या पदकांमधील या स्पर्धेतील मेडलची उणीवही भरून काढली.
मला वाटते की मी 100 मीटरमध्ये बरेच काही मिळवले आहे. 100 मीटरमध्ये मी आणखी वेगाने धावताना पाहण्याची चाहत्यांची इच्छा आहे. मात्र, 200 मीटर ही माझी पसंत आहे. 200 मीटरमध्ये मी आणखी काही खास करू इच्छितो.- युसेन बोल्ट, धावपटू