आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बोल्ट कधी पुढे गेला, ते गॅटलिनलाही कळले नाही!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रि ओ ऑलिम्पिकच्या १०० मीटर्स शर्यतीच्या अंतिम फेरीत सर्व धावपटूंच्या चेहऱ्यावर चिंता, दडपण जाणवत होते. अपवाद केवळ युसेन बोल्टचा. तो मात्र सहजतेने वावरत होता. शर्यतीला येताना वाटेत टी-शर्ट बदलले. ब्लॉकवर स्टार्टसाठी उभे राहण्याआधी प्रेक्षकांना खूण केली, मीच नंबर वन आहे. त्याचे नाव पुकारून ओळख करून देण्यात येत होती, तेव्हा तो आकाशातल्या देवाकडे प्रार्थना करत होता. पोटावरची ‘बोल्ट’ ही अक्षरे त्याने दाखवून आपणच या साम्राज्याचे अनभिषिक्त सम्राट असल्याची जाणीव इतरांना करून दिली.
नेहमीप्रमाणे त्याचा स्टार्ट हा ‘स्लो’ होता. २०११च्या विश्वचषकात फॉल्स स्टार्टमुळे बाद झाल्यापासून तर तो अधिकच सावध झाला होता. पूर्वीप्रमाणे आता एक चुकीचा स्टार्ट माफ नाही, याची जाणीव असल्याने रिओमध्ये त्याचा स्टार्ट आणखी स्लो होता. स्टार्टिंग ब्लॉकमधून त्याचा पाय निघाला, तेव्हा इतर धावपटू सुटले होते. पहिले ५० मीटर्स अंतर हे त्याचे नव्हतेच. तो त्याचा नेहमीच कच्चा दुवा होता. स्टार्ट गनला तो उशिरा प्रतिसाद देतो. रिओतही तसेच घडले.

तो ६ फूट ५ इंच उंचीचा आहे. एवढे उंच परंतु चपळ शरीर एखाद्या हवेच्या झोतासारखे पुढे जाते. शेवटच्या ५० मीटर्स अंतरात तो दिसतच नाही. बीजिंगलाही तेच घडले, लंडन ऑलिम्पिकमध्येही तो मागून पुढे गेला. रिओमध्ये गॅटलिन शेवटच्या १० मीटर्स अंतरापर्यंत पुढे होता; पण बाजूने बोल्ट कधी पुढे गेला, ते गॅटलिनलाही कळले नाही. तो शेवटच्या ५० मीटर्समध्ये भन्नाट वेगात धावतो. १०० मीटर्स अंतर गाठण्यासाठी त्याच्या प्रतिस्पर्ध्यांना ४३ ते ४६ पावले लागतात. तेच अंतर बोल्ट ४० ते ४१ पावलांत पार करतो. अंतिम रेषेनजीक येताना इतरांचा वेग कमी होतो, बोल्टचा मात्र वाढतो.

रिओमध्येही त्यामुळे तेच घडले. ऑलिम्पिकआधीची दुखणी, संथ वेग सारे काही नाटकी ठरले. नेहमीप्रमाणे या वेळी बोल्ट जिंकणार का, अशी अनेक स्वनिर्मित प्रश्नचिन्हे निर्माण करून परंपरेप्रमाणे तोच वेगवान मानव ठरला.

बोल्टने आपले बोल रिओमध्येही खरे करून दाखविले. अंतिम रेषा पार करताना काहीतरी वेगळे करण्याचा त्याचा मिश्कील स्वभाव त्याने या वेळीही दाखवून दिला. अंतिम रेषा पार केल्यानंतरही तो सुसाट पुढे धावत सुटला. त्याने वाटेत आपल्या चाहत्यांना मिठी मारली, उचलून घेतले. आपल्या नातेवाइकांना भेटला. पायातले बूट हातात घेऊन तो चक्क पहिल्या मजल्यावरच्या स्टँडपर्यंत पोहोचला. आईला, भावाला व घरातल्यांना मिठी मारली. १०० मीटर्स शर्यत जिंकल्यानंतर तो ४४० मीटर्स अंतर पुढे धावला.

दरम्यान, आपल्या मिश्कील स्वभावाच्या करामती करत होता. नेहमीची त्याची विजयानंतरची ‘पोझ’ दिली. त्यानंतर तब्बल दोन तास आपल्या चाहत्यांचे तो अशाच कृतींद्वारे समाधान करत होता.

बोल्टची निवृत्ती पुढल्या वर्षी : लंडन येथील पुढील वर्षी होणाऱ्या विश्व ट्रॅक अँड फील्ड अॅथलेटिक्स शर्यतीनंतर निवृत्त होण्याचे संकेत युसेन बोल्टने दिले आहेत. त्याच्या कर्तृत्वात मानाचा एक तुरा मात्र अद्याप रोवला गेला नाही. त्याला २०० मीटर्स शर्यतीत १९ सेकंदांची सीमा कमी करायची आहे. १९.१९ सेकंद वेग १९ सेकंदापेक्षा कमी नोंदवायची आहे.
बातम्या आणखी आहेत...