आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवा खेळाडूंना संधी देण्याची वेळ!- व्हीव्हीएस लक्ष्मण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आता युवा खेळाडूंना संधी देण्याची योग्य वेळी आली आहे, असे सांगून व्हीव्हीएस लक्ष्मणने आपल्या 16 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीला अलविदा केले. हैदराबाद येथे भारताच्या मधल्या फळीतील या आधारस्तंभाने निवृत्तीची घोषणा केला. मात्र, हैदराबादतर्फे प्रथम दर्जाचे क्रिकेट काही काळापुरते खेळत राहणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.
37 वर्षीय व्हीव्हीएस लक्ष्मणने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 281 धावांच्या अजरामर खेळीने सर्वर्शेष्ठ भारतीय फलंदाज म्हणून गौरव प्राप्त केला होता. देशासाठी अनेक सन्मानजनक विजय मिळवून देणार्‍या व्हीव्हीएस लक्ष्मणने आज अत्यंत जड अंत:करणाने पत्रकार परिषदेत आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. अतिशय कठोर आणि जड अंत:करणाने आपण हा निर्णय घेत असल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला, 'माझ्या आतील आवाजाने हा निर्णय घेण्याचे संकेत दिले होते. कारकीर्दीत योग्य त्या गोष्टीच मी केल्या. गेले चार दिवस माझ्या निवृत्तीच्या शक्यतेबाबत चर्चा होत होती. शेवटी मला वाटले की, हीच निवृत्तीसाठी योग्य वेळ आहे.' 'माझ्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा देशाचे आणि संघाचे हित यांनाच मी प्राधान्य दिले. देशाच्या यशात हातभार लावायला मला नेहमीच आवडले. विशेषत: इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या दोन देशांविरुद्ध यंदा देशातील आगामी आंतरराष्ट्रीय हंगाम पाहता तरुण खेळाडूंना योग्य वेळी संधी मिळावी यासाठी मी निवृत्त होण्यासाठी हीच योग्य वेळ आहे असे मला वाटते.'
'भारतासाठी खेळणे हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते. दैवाने मला ती संधी दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. देशासाठी खेळण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. त्याचप्रमाणे भारतीय क्रिकेट संघ ज्या काळात सवरेत्तम क्रिकेट खेळत होता त्याच काळात मला खेळण्याची संधी मिळाली हेदेखील मी माझे सुदैव समजतो. कारकीर्दीत मला मार्गदर्शन करणार्‍या आणि साहाय्य करणार्‍या प्रत्येकाचे मी आभार मानू इच्छितो.'ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत ईडन गार्डन, कोलकाता येथे फॉलोऑननंतर लक्ष्मणने काढलेल्या 281 धावांच्या अजरामर खेळीचा सदैव उल्लेख होत असतो. त्याबाबत लक्ष्मण म्हणाला, 'जेव्हा मी माझी 281 धावांची ती खेळी आठवतो तेव्हा मला नेहमीच वाटते, त्या ऐतिहासिक कसोटीच्या रोमहर्षक विजयाचा आपण एक भाग ठरलो. जेव्हा जेव्हा त्या डावाचा विचार करतो तेव्हा तेव्हा मी समजतो.
निवृत्तीचा निर्णय आश्चर्याचा- न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी निवड झाली असताना व्हीव्हीएस लक्ष्मणने निवृत्तीचा निर्णय घेतल्यामुळे मला आश्चर्याचा धक्काच बसला. त्याने निवृत्ती आधीच जाहीर का केली नाही? असो. लक्ष्मण हा खरा चॅम्पियन क्रिकेटपटू होता. - बापू नाडकर्णी, माजी क्रिकेटपटू
निर्णयामुळे मी सुन्न झालो- ऑस्ट्रेलियन गोलंदाजीच्या ठिकर्‍या उडवणार्‍या भारताच्या महान फलंदाजांपैकी एक असलेल्या लक्ष्मणच्या निवृत्तीच्या निर्णयामुळे मी सुन्न झालो. तो उत्तम फलंदाज होता व उत्तम सहकारीही होता. कारकीर्दीच्या अखेरीस त्याला पाठदुखीने त्रास दिला. मात्र, तरीही त्याने त्यावर मात करून कारकीर्द पुढे कायम सुरू ठेवली. 281 धावांची खेळी ही मी पाहिलेल्या क्रिकेटमधील डावांमधील सवरेत्तम खेळी होती. या खेळीसारखी कामगिरी अजूनपर्यंत पाहिली नाही. एक अजरामर अशी ही चमकदार कामगिरी त्याने केली.- चंदू बोर्डे माजी क्रिकेटपटू
281 धावा ऑस्ट्रेलियाविरुद्ध- कोलकाता येथील मैदानावर 2001 मध्ये खेळवली गेलेली ही झंझावाती खेळी कसोटी इतिहासामध्ये सर्वर्शेष्ठपैकी एक आहे. टीम इंडिया पहिल्या डावात 274 धावांनी पिछाडीवर होती. पराभवाचे सावट निर्माण झाले होते. दरम्यान, लक्ष्मणने मैदानावर जम बसवून 281 धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारताने ही कसोटी 171 धावांनी जिंकली.
96 धावा द.आफ्रिकेविरुद्ध- डर्बन येथे 2010 मध्ये झालेल्या कसोटी सामन्यातील भारताच्या विजयाचा शिल्पकार लक्ष्मण होता. भारतीय संघाने पहिल्या डावात 205 व दुसर्‍या डावात 228 धावा काढल्या होत्या. यामध्ये लक्ष्मणने 38 व 96 धावांचे योगदान दिले होते. तो दोन्ही डावांत भारताकडून सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला.
73* धावा ऑस्ट्रेलियाविरुद्ध- 2010 मध्ये मोहाली कसोटीमधील लक्ष्मणची खेळी अविस्मरणीय राहील. दुखापतीमुळे त्याला पहिल्या डावात दहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरावे लागले. भारताला विजयासाठी 216 धावांची आवश्यकता होती. त्या वेळी 8 बाद 124 धावा झाल्या होत्या. ईशांत व प्रज्ञानसोबत खेळी करत लक्ष्मणने विजय मिळवून दिला.
103 धावा श्रीलंकेविरुद्ध- कोलंबो कसोटीत लक्ष्मणने धडाकेबाज कामगिरी केली. विजयासाठी भारताला 257 धावांची आवश्यकता होती. लक्ष्मणने नाबाद शतक ठोकून भारताला शानदार विजय मिळवून दिला.
PHOTOS : व्‍हेरी व्‍हेरी स्‍पेशल लक्ष्‍मणचा क्रिकेटला अलविदा
‘गुणवत्ता सिद्ध करायला आवडते’, लक्ष्‍मणची 'व्‍हेरी व्‍हेरी स्‍पेशल' मुलाखत