आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेनिस : मियामी मास्टर्स; मिलोस राओनिकची आगेकूच; रांदावास्काचा पराभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मियामी - जगातील नंबर वन नोवाक योकोविकने पाचव्या किताबाच्या मोहिमेकडे आगेकूच करताना मियामी मास्टर्स टेनिस स्पर्धेची चौथी फेरी गाठली. त्याने पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत बेल्जियमच्या स्टीवन डॅरसिकचा पराभव केला. त्याने ६-०, ७-५ अशा फरकाने विजय संपादन केला.
आता त्याचा पुढचा सामना युक्रेनच्या डोगोप्लोवशी होणार आहे. दुसरीकडे कॅनडाचा मिलोस राओनिकनेही शानदार विजयासह पुढच्या फेरीत धडक मारली. ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन योकोविकने दमदार सुरुवात करताना पहिल्या सेटमध्ये सहज बाजी मारली. या वेळी बेल्जियमच्या खेळाडूला प्रत्युत्तराची फारशी संधीही मिळाली नाही. त्यानंतर त्याने दुसऱ्या सेटमध्ये जगातील नंबर वन खेळाडूला रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न केले.

दमदार पुनरागमनासह त्याने दुसऱ्या सेटमध्ये चोख प्रत्युत्तराची खेळी केली. त्यामुळे हा सेट ट्रायब्रेकरपर्यंत खेचला गेला. अखेर अनुभवाच्या बळावर योकोविकने हा सेट जिंकून सामना स्टीवनला बाहेरचा रस्ता दाखवला.
फेरर, इन्सर विजयी

चौथ्या मानांकित निशिकोरीसह इन्सर आणि डेव्हिड फेररने शानदर विजयासह पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत धडक मारली. जपानच्या निशिकोरीने सर्बियाच्या व्हिक्टर ट्रोएकीचा पराभव केला. त्याने ६३ मिनिटांमध्ये सामना जिंकला. निशिकोरीने ६-२, ६-२ अशा फरकाने धडाकेबाज विजयाची नोंद केली.
या सामन्यादरम्यान, व्हिक्टरला दोन वेळा गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याने उपचारासाठी थाेडा वेळ घेतला. मात्र, तरीही त्याला आपला पराभव टाळता आला नाही. दुसरीकडे २२ व्या मानांकित इन्सरने एकेरीच्या लढतीत बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोवला ७-६, ६-२ अशा फरकाने पराभूत केले. डेव्हिड फेररने चेक गणराज्यच्या लुकास रोसोलेवर ६-४, ७-५ ने मात केली.
राओनिकची चार्डीवर मात
पाचव्या मानांकित मिलोस राओनिकने तिसऱ्या फेरीत फ्रान्सच्या जेर्मी चार्डीचा पराभव केला. त्याने तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत ६-१, ५-७, ७-६ अशा फरकाने धडाकेबाज विजयाची नोंद केली. यासह त्याने चौथ्या फेरीतील प्रवेश निश्चित केला. मात्र, यासाठी त्याला फ्रान्सच्या खेळाडूने चांगलेच झुंजवले. त्याने दुसरा सेट जिंकून लढतीत बरोबरी साधली होती. मात्र, तिसऱ्या सेटमध्ये कॅनडाच्या राओनिकने बाजी मारली.
कार्ला सुआरेझकडून रांदावास्का पराभूत

महिला एकेरीच्या लढतीत स्पेनच्या कार्ला सुआरेझ नवरोजने सनसनाटी विजयाची नोंद केली. तिने आक्रमक खेळी करताना अग्निजस्का रांदावास्काचा पराभव केला. तिने ५-७, ६-०, ६-४ अशा फरकाने रोमांचक विजय मिळवला. रांदावास्काने दमदार सुरुवात करताना पहिल्या सेटमध्ये बाजी मारली. मात्र, तिला पुढील दोन्ही सेटमध्ये आपली लय कायम ठेवता आली नाही. याचा फायदा घेत सुआरेझने सामना जिंकला. यासह तिने पुढच्या फेरीत धडक मारली. आता तिचा सामना जगातील माजी नंबर वन व्हिनस विल्यम्सशी होईल.