आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Very Good Performance Of Tennis Players After Rebelling

टेनिस असोसिएशनच्या विरोधात केलेल्या बंडानंतर टेनिसपटूंची वर्षभरात उज्ज्वल कामगिरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय टेनिस असोसिएशनच्या विरोधात वर्षाच्या प्रारंभी बंड केल्यानंतर झालेले बदल आणि त्यानंतर पेस, सानिया आणि सोमदेवने केलेल्या चांगल्या वैयक्तिक कामगिरीच्या बळावर भारतीय टेनिसमध्ये पुन्हा चैतन्य पसरले आहे. ऑल इंडिया टेनिस असोसिएशनच्या विरोधात 11 भारतीय टेनिसपटूंनी केलेले बंड चांगलेच गाजले. या बंडाचे नेतृत्व नेहमी शांत भासणार्‍या सोमदेव देववर्मनने केले. त्यानंतर डेव्हिस चषकाच्या सहायकांचा संघच बदलण्यात आल्याने या बंडाला चांगलेच महत्त्वदेखील प्राप्त झाले होते. मात्र, दोन्ही बाजूने काही प्रमाणात तडजोडीचा मार्ग पत्करल्याने ते अधिक पसरले नाही. मात्र, सोमदेवने स्वत:च्या कामगिरीत जबरदस्त सुधारणा घडवत थेट पहिल्या शंभर मानांकनाच्या आत धडक मारली.
पेसचा अजून एक ग्रँडस्लॅम विजय
भारताच्या लिएंडर पेसने वयाच्या चाळिसाव्या वर्षी रांदेक स्टेपानेकच्या साथीने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद पटकावत त्याच्यात अजून बरेच टेनिस शिल्लक असल्याचे सिद्ध केले. भूपतीने दुबईत मायकल लॉड्रासह स्पर्धेचे विजेतेपद, तर रोम मास्टर्समध्ये उपविजेतेपद मिळवले. मात्र, त्यापेक्षाही मोठे यश म्हणजे आयपीएल धर्तीवर टेनिस सामन्यांच्या आयोजनास जागतिक टेनिस असोसिएशनकडून पाठिंबा हे ठरले आहे.
सानियाचे खणखणीत यश
सानियाने तिच्या करिअरमध्ये मिळवलेल्या एकूण 19 विजेतेपदांपैकी 5 विजेतेपदे सरत्या वर्षात पटकावली आहेत. या विजयांमुळे तिने थेट पहिल्या 10 जोड्यांमध्ये मानांकन मिळवले आहे. त्यामुळे नवव्या मानांकनासह ती सरत्या वर्षातील भारताची सर्वोत्तम मानांकनप्राप्त खेळाडू ठरली आहे.