आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या हॉकी इंडियाच्या राष्ट्रीय बैठकीत विदर्भ हॉकी संघटनेला सहायक सदस्यत्वाची मान्यता देण्यात आली. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे विदर्भ हॉकीशी संलग्न असलेल्या राज्यातील 22 जिल्ह्यांच्या खेळाडूंना मोठी संधी उपलब्ध झाली असल्याची माहिती विदर्भ हॉकीचे सचिव विनोद गवई यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. त्याचबरोबर मुंबई हॉकीलादेखील सहायक सदस्य म्हणून सहभागी करण्यात आले आहे.
महाराष्टÑासह आता मुंबई व विदर्भ असे तीन संघ राज्याचे स्वतंत्र नेतृत्व करतील. विशेष म्हणजे महिला हॉकी संघ निवडदेखील विदर्भ हॉकीच्या अंतर्गत होणार आहे.
पुणे, मुंबईच्या बरोबरीने 22 जिल्ह्यांना संधी
हॉकी इंडियाने विदर्भ व मुंबईला मान्यता देऊन राज्यातील जास्तीत जास्त खेळाडूंना स्पर्धेत खेळण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. पूर्वी महाराष्टÑ हॉकीची केवळ एक टीम (18 खेळाडू) राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत असे. पुणे-मुंबईच्या खेळाडूंचे वर्चस्व असल्याने इतर जिल्ह्यांतील खेळाडू मागे पडले होते. आता विदर्भ व मुंबई संघाचा समावेश झाल्याने राज्यातील एकाच वेळी तीन संघ मिळून 54 खेळाडूंना उच्च स्तरावर खेळण्यास मिळणार आहे.
विदर्भ हॉकीशी संलग्न जिल्हे
विदर्भ
अमरावती, बुलडाणा, अकोला, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, वाशीम, वर्धा, भंडारा.
मराठवाडा
औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी.
खान्देश
जळगाव, धुळे, नंदुरबार.
नागपूर पॅटर्न राबवणार
सर्व जिल्ह्यांमध्ये नागपूर पॅटर्न राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यात प्रत्येकी 14, 17 व 20 वर्षांखालील खेळाडूंची लीग घेण्यात येईल. यातील गुणवंत खेळाडूंना तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन देण्यात येईल. त्याचबरोबर अॅस्ट्रो टर्फ उभारण्यासाठी संघटना प्रयत्नशील राहणार असून खेळाडूंना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यावर संघटना भर देणार असल्याचे गवई म्हणाले.
अॅस्ट्रो टर्फसाठी पाठपुरावा करणार
औरंगाबादमधील विभागीय क्रीडा संकुलातील अॅस्ट्रो टर्फचा प्रश्न मार्गी लावणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यासाठी आश्वासन दिले होते. याचा पाठपुरावा करणार आहे. औरंगाबाद संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत जोशी व सचिव पंकज भारसाखळे यांना खेळ वाढीसाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असे गवई म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.