मुंबई - टेनिस रॅकेट हातात असतानाची सफाई, सहजसुंदरता बुधवारी विजय अमृतराजने माइक हातात घेऊन मुंबईत चॅम्पियन्स टेनिस लीगची (सीटीएल) घोषणा करताना दाखवली. बंगळुरू, पंजाब, पुणे, चेन्नई, दिल्ली आणि मुंबई शहराच्या टेनिस लीगची घोषणा करताना दिग्गज आंतरराष्ट्रीय टेनिसपटूंपासून भारताच्या उदयोन्मुख खेळाडूंची फ्रँचायझीमधील विभागणी सोप्या पद्धतीने सादर केली.
येत्या १७ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत भारतात ही टेनिस लीग रंगेल. २६ नोव्हेंबरचा अंतिम सामना कुठे होणार, याबाबत जशी अनिश्चितता व्यक्त करण्यात आली, तशीच अनिश्चितता मुंबई संघाच्या प्रायोजकाबाबत आणि टायटल स्पॉन्सर्सच्या बाबतीतही होती. खेळाडू वाटपाच्या वेळी मुंबई संघाचे टेबल मोकळे होते.
त्याबाबत अमृतराज म्हणाला, ‘मुंबई संघाचे पुरस्कर्ते अमेरिकेत आहेत. मात्र त्यांचे भारतातील, मुंबईतील सहकारीही पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्यासोबत अमेरिकेच्या दौ-यावर गेले आहेत.' अमृतराजने मुंबई संघाच्या पुरस्कर्त्यांचे नाव शेवटपर्यंत सांगितले नाही.
..तर मोदीसोबत असतो
मी या वेळी पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत अमेरिकेत असायला हवे होते, असे अमृतराज म्हणाला. अमृतराज याची अमेरिकेतील लोकप्रियता अफाट आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी विजय अमृतराजलाही
आपल्या अमेरिका दौ-यात उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र, टेनिस लीगच्या फ्रँचायझींची घोषणा करणे अत्यावश्यक असल्याने आपण येथे आलो, असे अमृतराज म्हणाला.
दोन विभागांत होणार स्पर्धा
उत्तर व दक्षिण अशा दोन विभागांत तीन-तीन संघांची विभागणी करण्यात येईल. एकाच वेळी सलग दोन दिवस प्रत्येक विभागाचे एक-एक संघ आमने-सामने राहतील. म्हणजे १७ व १८ नोव्हेंबरला दिल्ली संघ स्वगृही खेळतील.
( छायाचित्र : मुंबईत बुधवारी टेनिस लीगची घोषणा करताना विजय अमृतराज.)