आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vinayak Dalavi About Lord Cricket Stadium, London, Divya Marathi

महिमा ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानाचा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानाने भारतीय क्रिकेटलाही भरभरून दिले. जगाच्या क्रिकेटचे मुख्यालय असताना आयसीसीचे चेअरमन म्हणून जगमोहन दालमिया, शरद पवार लॉर्ड्स येथेच आपल्या पदावर विराजमान झाले. 1983 मध्ये कपिलदेवच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर विश्वचषक जिंकला. लॉर्ड्सने भारताला विजयाचे अनेक सुखद क्षण अनुभवायला दिले. परवाचा विजयही तसाच सुखद आहे.

आजही सुटाबुटात, टाय बांधून उकाड्यातही चेहर्‍यावरची रेषाही न हलविता सामना पाहणारे प्रेक्षक येथेच सापडतात. तेवढेच नव्हे तर प्रत्येक स्टॅँडमधला क्रिकेट रसिक प्रत्येक चांगल्या कामगिरीला दाद देणारा असतो. भले मग तो खेळाडू प्रतिस्पर्धी संघाचा असो. प्रत्येक चौकार, षटकार, क्षेत्ररक्षण आणि चांगल्या गोलंदाजीचे कौतुक केले जाते.

अजिंक्य रहाणेच्या निर्दोष शतकाचे ब्रिटिशांनी भरभरून कौतुक केले. हिरव्यागार खेळपट्टीवर अजिंक्य रहाणेने केलेल्या खेळाला अनेक माजी कसोटीपटूंनी दाद दिली. अ‍ॅँडरसनविरुद्ध तक्रार करणार्‍या रवींद्र जडेजाच्या भारताच्या दुसर्‍या डावातील सामना फिरविणार्‍या 68 धावांच्या खेळीचे कौतुक करताना त्यांनी मनात कटुता बाळगली नाही.

तीन वर्षांपूर्वी, म्हणजे 2011 च्या जुलै महिन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यातील शंभरावा कसोटी सामना होता. त्या सामन्यात खेळणार्‍या सचिन तेंडुलकरची लॉर्ड्सवरील ती अखेरची कसोटी खेळी होती. सचिन मैदानावर येण्याआधीच सर्व प्रेक्षक आपापल्या जागेवर उभे होते. सचिन बाद झाल्यानंतरही आपल्या येथे जसे काही ‘कुत्सित’ आवाज घुमतात तसे काही घडले नाही. उलट सचिन बाद झाल्यानंतरही त्याला उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात पॅव्हेलियनपर्यंत मानवंदना देणारे प्रेक्षक फक्त लॉडर्सवरच पाहिले.

डीआरएसला विरोध
भारत-इंग्लंड शतकमहोत्सवी सामन्याच्या वेळी लॉर्ड्सच्या प्रेसिडेंट बॉक्समध्ये मी शरद पवारांना भेटलो होतो. त्या वेळी ते आयसीसीचे अध्यक्ष होते. जहीर खान जायबंदी झाला होता तर सचिनला अन्नातून विषबाधा झाली होती. भारताला कसोटी वाचवण्याची संधी होती. द्रविड, गंभीर मैदानावर तळ ठोकून बसले होते. पंचांनी गंभीरला पायचीत देताच पवारांचा चेहरा गंभीर झाला. मला म्हणाले, बाद होता? मी म्हटलं, तो पायचीत नसला तरीही आपण काहीही करू शकत नाही. कारण बीसीसीआयनेच डीआरएसला आक्षेप घेतला आहे. त्यामुळे भारताचा फलंदाज बाद नसला तरीही आपल्याला काहीही करता येणार नाही. या वेळीही तसेच घडले. भारताचा पहिल्या डावातील शतकवीर रहाणेला मनगटावर चेंडू आदळून उडाल्यानंतर झेलबाद ठरवण्यात आले होते. या वेळीही आपणाला डीआरएसला विरोध केल्याचा फटका बसला.