आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खेळाडूंचे ऑलिम्पिक स्पर्धेचे यश, पदक म्हणजे औटघटकेचे साम्राज्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑलिम्पिक सुवर्ण, कांस्य व रौप्यपदकाची किंमत किती? हा प्रश्न प्रेक्षकांना नाही तर ती पदके जिंकणाऱ्यांना कायम भेडसावत असतो. मायकेल फेल्प्स, युसेन बोल्ट किंवा अमेरिकेची विद्यमान जिम्नॅस्ट सायमन बाइल्स यांच्यासारख्यांना कदाचित हा प्रश्न पडत नसेल. रिओ ऑलिम्पिकच्या उद््घाटन सोहळ्यात मार्च पास्टसाठी उतरलेले उर्वरित १० हजारांहून अधिक खेळाडू याच विवंचनेत असतील. किमान चार वर्षांची कठोर मेहनत, पैसा, वेळ आणि कौटुंबिक आयुष्यावर सोडलेले पाणी, खाण्याच्या आवडीनिवडी मागे सारून सतत केलेला सराव. यानंतर मिळालेले पदक किती फलदायी ठरते, हे नियतीच ठरवते. अमेरिकेसारख्या प्रगत आणि क्रीडासंस्कृती रुजलेल्या देशातील शेकडो ऑलिम्पियन आपल्या भविष्याच्या चिंतेत कायम असतात. भारतासारख्या देशाने सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंसाठी १ कोटीचे बक्षीस जाहीर केलेले कळल्यानंतर त्यांच्याही भुवया उंचावल्या होत्या. कारण अमेरिकेने सुवर्णपदक विजेत्याला २५ हजार, रौप्यपदक विजेत्याला १५ आणि कांस्यपदक विजेत्याला १० हजार यूएस डॉलर्सची बक्षिसी जाहीर केली आहे. टॅक्स कापून त्यापैकी फारच कमी रक्कम हातात पडते. रिओमध्ये आलेल्या शंभराहून अधिक अमेरिकन खेळाडूंनी स्वत:ची ‘गो फंड मी’ अशी पेजेस तयार केली आहेत.

वर्षाला आपल्या खेळाच्या गरजा भागवण्यासाठीचे बजेट प्रत्येकाने त्यात टाकले आहे. मात्र त्यापैकी फारच कमी सुदैवी खेळाडू आहेत, त्यांचे वर्षभराच्या गरजेचे लक्ष्य पूर्ण झाले. जेरेमी तैवोला अपेक्षेपेक्षा (१५ हजार यूएस डॉलर्स) जास्त (१८३३१ यूएस डॉलर्स) पैसे मिळाले. त्यासाठी तब्बल दीडशे लोकांनी त्याला देणग्या दिल्या होत्या. देशवासीयांपेक्षाही त्या १५० लोकांच्या अपेक्षांचे ओझे जास्त असल्याची जाणीव जेरेमीला रिओत झाली. सरकार फार काही करत नाही. मग स्वत:चा प्रशिक्षण कार्यक्रम सांभाळून स्वत:ला जमेल ती कामे, पार्ट टाइमर म्हणून हे खेळाडू करीत असतात. सुवर्णपदक गळ्यात लटकते, देशाचे राष्ट्रगीत वाजते, त्या क्षणापुरतेच दु:ख विसरले जाते. त्यानंतर अनेक अॅथलिटच्या पुढे भवितव्याचा प्रश्न भेडसावत असतो. हातातोंडाची गाठ पडण्यासाठी, कुटुंबाला पोसण्यासाठी, एवढेच नव्हे तर स्वत:चे घर घेण्यासाठीही पैसे नसतात. चीनचे अॅथलिट मात्र याबाबतीत सुदैवी आहेत. रिओमधील प्रत्येक पदक विजेत्याला एक घर आणि मोटार देण्याची घोषणा चीनने केली आहे.

मात्र विदारक सत्य हे आहे की, ऑलिम्पिक क्रीडा प्रकारातील यशामुळे आर्थिक स्थैर्य फारसे मिळत नाही. स्वत:वरच पैसा अधिक खर्च होतो. शिवाय पुरस्कर्तेही फारसे मिळत नाहीत. त्याचे प्रमुख कारण म्हणजे, बहुतेक ऑलिम्पिक क्रीडा प्रकार हे पुरस्कर्त्यांना फारशी प्रसिद्धी मिळवून देत नाहीत. ऑलिम्पिकनंतरच्या काही महिन्यांतच ‘ऑलिम्पिक स्टार्स’ची प्रसिद्धी हळूहळू कमी व्हायला लागते. नंतर प्रतीक्षा चार वर्षांनी येणाऱ्या ऑलिम्पिकची करावी लागते. नंतर अनेकांचे जीवनही उद्ध्वस्त होते. केनियाच्या ३ हजार स्टीपलचेसची सुवर्णपदक विजेती रूथ जिबेट पोडियमवर उभी राहिली, तेव्हा राष्ट्रगीत बहरिनचे वाजले. पोटासाठी तिने मातृभूमी व मातृदेशाचाच त्याग केला. पदक मिळाल्यानंतरचे आनंदाश्रू नंतरच्या काळात मात्र सर्वांसाठी तसे राहत नाहीत. ऑलिम्पिकमधील यशस्वी योद्ध्यांची हीच खरी शोकांतिका आहे.
बातम्या आणखी आहेत...