आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विजयाने भरून निघाली मागच्या पराभवाची जखम (विनायक दळवी थेट रिओतून..)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धा यजमान देशाचे भाग्य बदलत असते. कदाचित ऑलिम्पिकच्या १२० वर्षांच्या इतिहासातील फुटबॉलचे पहिले सुवर्णपदक ब्राझीलचे भाग्यविधाते ठरेल. शनिवारी रात्री माराकाना फुटबॉल स्टेडियमवर ब्राझीलने पेनल्टी शूटआऊटमध्ये जर्मनीवर मात केली. ही घटना जय-विजयाच्या पलीकडची आहे.
गेली दोन वर्षे प्रत्येक ब्राझीलवासीय जर्मनीने दोन वर्षांपूर्वी त्यांच्याच भूमीवर विश्वविजयात, उपांत्य फेरीत केलेल्या ७-१ पराभवाची जखम देऊन जगत होते. भारतात क्रिकेट खेळ नव्हे धर्म आहे. ब्राझीलचा धर्म फुटबॉल आहे. जर्मनीने जेव्हा त्यांच्याच घरात येऊन २०१२ च्या विश्वचषकातून त्यांना बाहेर काढले, तेव्हाच ब्राझीलचा प्रत्येक नागरिक खचला होता. पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता. सुडाच्या भावनेने जगत होता. आर्थिक मंदी, ‘झिका’चे आक्रमण आणि ऑलिम्पिक आयोजनाचे आव्हान यांनी तो खचला होता. ऑलिम्पिक होणार किंवा नाहीत हे प्रश्नचिन्ह निर्माण करण्याइतका निराश झाला होता.

सर्व शंका-कुशंका, अशक्यता यांना छेद देत त्यांनी रिओ ऑलिम्पिकचे यशस्वी आयोजन केले. ब्राझीलच्या नागरिकांवर यानंतर करवाढीची कुऱ्हाड चालणार आहे. ते दु:खही पचवून त्यांनी सुहास्य वदनाने तमाम विश्वाचे स्वागत केले, तरीही गेले २० दिवस त्या चेहऱ्यांवर स्वप्नपूर्तीचा आनंद दिसत नव्हता. फुटबॉल अंतिम सामन्यात नेमारची अखेरची पेनल्टी किक जर्मन गोल पोस्ट भेदून गेली आणि जादूची कांडी फिरावी तसे चित्र बदलले. आनंद काय असतो ते रिओमध्ये प्रथम अनुभवले. नेमारपासून प्रत्येक खेळाडूच्या अश्रूंचा बांध फुटला. संपूर्ण देश आनंदात न्हाऊन निघाला होता. रिओमध्ये कार्निव्हल फेब्रुवारी महिन्यात असते; पण शनिवारी रात्रीपासून येथे कार्निव्हल सुरू झाले आहे. स्टेडियमवरचे दृश्य अलौकिक होते. प्रत्येक जण एकमेकांना मिठ्या मारून आनंद व्यक्त करत होता. भारताने १९८३ चा विश्वचषक जेव्हा जिंकला किंवा २०११ ला जेव्हा आपण पुन्हा विश्वविजेते झालो, तेव्हाचे चित्र येथे पाहावयास मिळाले. रस्ते माणसांनी फुलले होते. संपूर्ण देशात जागोजागी मोठे स्क्रीन लावून फुटबॉल मॅच सर्वांनी पाहिली. विजयाचे रूपांतर नंतर कार्निव्हलमध्ये झाले. महागाई, आर्थिक मंदी, ‘झिका’चे आक्रमण, ऑलिम्पिकचा खर्च आणि त्यामुळे देशावर पडलेला आर्थिक बोजा हे सारे काही एका गोलने ब्राझीलवासीयांना विसरायला लावले.

रविवारचा ऑलिम्पिक समारोप सोहळा, हा केवळ उरकायचा सोपस्कार ठरला आहे. ब्राझीलने ऑलिम्पिक एक दिवस आधीच यशस्वी केले. ऑलिम्पिक यशाने नव्हे तर फुटबॉलच्या सुवर्णपदकाने या देशाला नवा हुरूप, जिद्द, ईर्ष्या दिली आहे. ऑलिम्पिक यशस्वी केलं यापेक्षाही जर्मनीविरुद्धच्या अंतिम सामन्याची चर्चा घरोघरी, रस्त्यावर होईल. पराभवाची एक जखम भरून निघाली आहे. आर्थिक मंदी असताना ब्राझीलने रिओचे यशस्वी आयोजन करून दाखवले. फुटबॉलच्या विजयाने त्यांचा आनंद द्विगुणित झाला.
बातम्या आणखी आहेत...