आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

24 वर्षांची सवय मोडेल! कसोटी पाहण्याची ओढ यापुढे नाही : आचरेकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवर्य रमाकांत आचरेकर; भारत सरकारने ज्यांना द्रोणाचार्य पुरस्कार देऊन गौरविले होते. सचिन तेंडुलकर हा त्यांचा आवडता शिष्य मुंबईत आपल्या कारकीर्दीचा अखेरचा कसोटी क्रिकेट सामना खेळत आहे. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, प्रवीण आमरे, चंद्रकांत पंडित, लालचंद राजपूत, बलविंदरसिंग संधू, रामनाथ पारकर, रमेश पोवार हे भारतासाठी खेळले. अशी दर्जेदार आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंची पिढी घडविणारे रमाकांत आचरेकर, सध्या गलितगात्र होऊन पडले आहेत. आपल्या शिष्याच्या सचिनच्या दर्जेदार खेळांच्या आठवणींच्या ‘टॉनिक’वर सध्या आयुष्याच्या संधिप्रकाशाचा आनंद उपभोगत आहेत. त्यांच्याशी साधलेला हा संवाद.
प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे आचरेकर सरांचे शब्दोच्चार स्पष्ट होत नाहीत. त्यांची मुलगी कल्पना, जी स्वत: उत्तम महिला क्रिकेटपटू आहे, तिच्या मदतीने साकारलेले आचरेकर सरांचे हे आपल्या शिष्योत्तमाबद्दलचे मनोगत...
गेल्या महिन्यात अचानक सचिनचा (आचरेकर सरांना) फोन आला. सचिनने तेव्हा तो निवृत्त होत असल्याचे सांगितले. क्षणभर तोच बोलत आहे यावर माझा विश्वास बसत नव्हता. कुणी तरी त्याच्या आवाजाची नक्कल करून फसवत तर नाही ना, अशी शंका येत होती; पण दौ-यावर निघण्याआधी सचिन घरी आला आणि अंगावर वीज कोसळवणारी ती बातमी खरी असल्याची खात्री पटली.
त्या वेळी खूपच वाईट वाटले. सचिन घरी मला भेटायला आला होता, त्याचे कारण होते, आपली अखेरची कसोटी मी वानखेडे स्टेडियममध्ये, येऊन पाहावी, अशी त्याची इच्छा होती. मला आधाराशिवाय, कुणाच्या मदतीशिवाय आत्ता हलताही येत नाही याची त्याला पूर्ण कल्पना आहे. म्हणूनच तो मला एक आश्वासन द्यायला आला होता. मी आईलाही कसोटी पाहण्यासाठी बोलावले आहे. आईची जशी व्यवस्था केली आहे तशीच तुमचीही व्यवस्था मी करणार आहे. त्यामुळे मी आत्ता निश्चिंत झालो आहे. मात्र, या कसोटी सामन्यानंतर माझी मानसिक स्थिती काय असेल याचे वर्णन करता येणार नाही. गेल्या 24 वर्षांची एक चांगली सवय तुटणार आहे. ती सवय अचानक तुटणार आहे. सचिन खेळणार आहे म्हटल्यावर एक आपुलकीची भावना सामना पाहताना वाटायची. सचिन खेळणार आहे हे म्हटल्यावर एक ओढ वाटायची; सामना पाहण्याची. ती ओढ यापुढे राहणार नाही. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी - सचिन अचानक घरी आला त्या वेळीही आश्चर्य वाटले होते. त्याला म्हटले, ‘‘निवृत्तीचा निर्णय असा तडकाफडकी का घेतलास?’’ त्यावर सचिन म्हणाला होता, ‘‘सर, आता दुखापती खूप वाढल्या आहेत. त्यामुळे फॉर्मबरोबरच ‘फिटनेस’ राखणे हे एक ‘चॅलेंज’ झाले आहे. शिवाय आता कसोटी सामन्यांमध्ये पुष्कळ अंतर आहे. तेवढा काळ खेचण्यासाठी फिटनेसवर अधिक वेळ खर्ची घालावा लागणार होता.’’
सरांसाठी केली खास व्यवस्था
सचिनने आईसाठी प्रेसिडेंट बॉक्समये बसण्याची व्यवस्था केली आहे. तेथेच रमाकांत आचरेकर यांना बसवण्यात येणार आहे. प्रेसिडेंट बॉक्सच्या प्रवेशद्वारावर लाकडाचा एक ‘रॅम्प’ तयार करण्यात आला आहे. व्हीलचेअर त्या रॅम्पवरून नेण्यात येणार आहे. सचिनने या सर्व व्यवस्थेसाठी आचरेकर सरांची मुलगी कल्पना हिला आपल्या पत्नीशी अंजलीशी संपर्कात राहण्यास सांगितले.
बॅट पकडण्याची चुकीची पद्धतच बनली सवय
सुरुवातीच्या काळात सचिन फलंदाजीसाठी त्याचा भाऊ अजितची बॅट वापरायचा. सचिनच्या देहयष्टीच्या मानाने ती बॅट आकाराने आणि वजनानेही मोठी होती. त्यामुळे सचिनला हँडलच्या अगदी खाली बॅट पकडावी लागायची. त्याची बॅट पकडण्याची ही पद्धत क्रिकेटच्या तंत्रशुद्धतेसाठी चुकीची होती. आचरेकर सरांच्या लक्षात सचिनची ही चूक आली आणि त्यांनी बॅट पकडण्याची तंत्रशुद्ध पद्धत सचिनला सांगितली. सचिनने सरांचा हा सल्ला मान्य केला; परंतु या बदलामुळे त्याला फलंदाजी करण्यात अडचण येऊ लागली आणि नकळतपणे तो परत पूर्वीसारखीच बॅट पकडू लागला.