आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vinoo Mankad Cricket : Maharashtra Defeated Saurashtra

विनू मंकड क्रिकेट स्पर्धा: महाराष्‍ट्राचा सौराष्‍ट्रावर दणदणीत विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकोट - येथे सुरू असलेल्या पश्चिम विभागीय विनू मंकड क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाहुण्या महाराष्‍ट्र संघाने यजमान सौराष्‍ट्रावर 10 विकेटने दणदणीत विजय मिळवला. महाराष्‍ट्राच्या विजयात कर्णधार विजय झोलने नाबाद 72 धावा काढून सिंहाचा वाटा उचलला. सौराष्‍ट्राने प्रथम फलंदाजी करताना 42.2 षटकांत सर्वबाद अवघ्या 112 धावा काढल्या. प्रत्युत्तरात महाराष्‍ट्राने हे लक्ष्य 26.5 षटकांत एकही विकेट न गमावता सहजपणे गाठले.


धावांचा पाठलाग करताना भारताच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघाचा कर्णधार आणि जालन्याचा गुणवंत खेळाडू विजय हरिभाऊ झोलने 90 चेंडूंचा सामना करताना 10 चौकारांच्या साह्याने नाबाद 72 धावा काढल्या. दुसरा सलामीवीर जे. एस. पांडेने नाबाद 39 धावांचे योगदान दिले. त्याने 71 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार मारले. दोघांनी सलामीसाठी अभेद्य 114 धावांची भागीदारी करून विजयावर शिक्कामोर्तब केले.


तत्पूर्वी, कलंत्री आणि जळगावचा जगदीश झोपेच्या दमदार गोलंदाजीच्या बळावर महाराष्‍ट्राने सौराष्‍ट्राला अवघ्या 112 धावांत गुंडाळले. सौराष्‍ट्राकडून पित्रोदा (44), एस. व्यास (25) आणि कोठारिया (20) यांनीच दोनअंकी धावसंख्या काढली. इतरांनी सपशेल निराशा केली. सौराष्‍ट्राचे तीन खेळाडू धावबाद झाले. महाराष्‍ट्राकडून एम. कलंत्रीने 10 षटकांत 19 धावांच्या मोबदल्यात तीन गडी बाद केले. त्याने तीन षटके निर्धाव टाकली. जगदीश झोपेने 8.2 षटकांत 19 धावांच्या मोबदल्यात दोघांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.


संक्षिप्त धावफलक
सौराष्‍ट्र : 112. (पित्रोदा 44, एस. व्यास 25, 3/19 कलंत्री, 2/19 जगदीश झोपे).
महाराष्‍ट्र : 26.5 षटकांत बिनबाद 114. (विजय झोल नाबाद 72, जे. पांडे नाबाद 39).