आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराटचा राग नाकावर, वागणुकीवर सर्वत्र टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मिस्टर कूल महेंद्रसिंग धोनीचा उत्तराधिकारी विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्ध 3-0 ने निर्णायक आघाडी घेतली असली तरीही त्याच्या वागणुकीवर सर्वत्र टीका होत आहे. दुसर्‍या वनडेत त्याने पंचासोबत वाद घातला, तर तिसर्‍या वनडेत तो अंबाती रायडूवर बरसला. कोहलीचा राग नेहमी नाकावर असतो, असे त्याच्याबद्दल बोलले जात आहे.

रायडूवर बरसला : तिसर्‍या वनडेत फलंदाजीच्या वेळी कोहलीला धावून दोन धावा घ्यायच्या होत्या. मात्र, रायडू असे करू शकला नाही. यामुळे कोहली त्याच्यावर चांगलाच तापला. भारत धावांचा पाठलाग करताना कोहली आणि रायडू खेळपट्टीवर असताना ही घटना घडली. त्या वेळी 27 व्या षटकात एल्टन चिगुंबुरा गोलंदाजी करीत होता. या षटकाच्या दुसर्‍या चेंडूवर कोहलीने पॉइंटकडे फटका खेळून वेगाने पहिली धाव घेतली. त्याला दुसरी धावसुद्धा घ्यायची होती. मात्र, त्याचा सहकारी फलंदाज रायडू यासाठी तयार नव्हता. यामुळे कर्णधार कोहली दुसरी धाव घेऊ शकला नाही. यामुळे कोहली चांगलाच तापला आणि रायडूला फटकारले. खरे तर कोहलीने ज्या ठिकाणी फटका खेळला होता तेथून दुसरी धाव घेणे शक्यसुद्धा नव्हते. हा फक्त योगायोग आहे की, कोहलीच्या नेतृत्वाखाली रायडूने वनडेत पदार्पण केले. मात्र, याच रायडूच्या नेतृत्वाखाली कोहलीने 2004 मध्ये अंडर 19 च्या वर्ल्डकपमध्ये सहभाग घेतला होता.

पर्थवरसुद्धा रागावला होता : ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ कसोटीत शतक ठोकल्यानंतर कोहलीने शतकाचा जल्लोष इतक्या रागात साजरा केला की, सुनील गावसकरनेसुद्धा त्या वेळी कोहलीने रागावर नियंत्रण मिळवणे शिकले पाहिजे, असा सल्ला दिला होता. त्या वेळी कोहली ऑस्ट्रेलियाच्या आक्रमक रूपामुळे चिडलेला होता. शतकानंतर राग नव्हे तर आनंद व्यक्त केला पाहिजे, असे गावसकर यांनी म्हटले होते.

अँडिलेडमध्ये दाखवले होते बोट : आपल्या फलंदाजीसोबत राग आणि तापट स्वभावामुळे कोहली चुकीच्या कारणांमुळे चर्चेत येतो. मागच्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौर्‍यातच अँडिलेड कसोटीत प्रेक्षकांनी डिवचल्यानंतर नाराज झालेल्या कोहलीने हाताचे मधले बोट दाखवून नव्या वादाला खतपाणी घातले होते.


गंभीरसोबतही झाला वाद
या वर्षी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंर्जस बंगळुरूचे नेतृत्व करीत असताना केकेआरचा कर्णधार गौतम गंभीरसोबत कोहलीचे भांडण झाले होते. कोहली आणि गंभीर भारताकडून एकत्र खेळत असताना आपल्या संघाच्या खेळाडूवर इतका राग करण्याची कोहलीला गरजच काय, असा प्रश्न निर्माण झाला.

धोनी आणि सचिनकडून त्याने बोध घ्यावा
रागावर नियंत्रण कसे मिळवायचे, याबाबत कोहलीने सचिन तेंडुलकर आणि मिस्टर कूल कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडून बोध घेतला पाहिजे, असे मत माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले. शिखरावर पोहोचण्यासाठी शांत राहणे किती गरजेचे आहे, हे कोहलीला कळले पाहिजे.

आक्रमकता कशाला ?
बंगाल संघाचे प्रशिक्षक अशोक मल्होत्रा यांच्या मते, कर्णधार म्हणून विराट कोहलीत भारताचा माजी कर्णधार गांगुलीसारखे गुण दिसतात. गांगुलीसुद्धा आपले आक्रमक नेतृत्व, जोश आणि खुन्नशीमुळे ओळखला जायचा. असे असले तरीही गांगुलीची आक्रमकता खेळ आणि रणनीतीपुरतीच र्मयादित असायची. वागणुकीत त्याने कधीच आक्रमकता आणली नाही. याविरुद्ध कोहली वागणुकीमुळे टीकेचा केंद्रबिंदू ठरत आहे.