आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virat Kohli Is First To Score 100 Aginst Pakistan In WC

कोहली ठरला पाकिस्तानविरोधात वर्ल्ड कपमध्ये शतक करणारा पहिला भारतीय फलंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विश्वचषकातील सामन्यांत पाकिस्तानच्या विरोधात शतक करणारा विराट कोहली पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने 126 चेंडूमध्ये 107 धावा केल्या. कोहलीने ही खेळी करताना दोन शतकी भागीदारी केल्या. त्याच जोरावर भारताला 300 धावांचा टप्पा गाठण्यात यश मिळाले.
रोहित शर्मा आणि शिखर धवनने अत्यंत सावध सुरुवात केली. पण एक फटका लगावण्याच्या प्रयत्नात रोहित झेलबाद झाला. त्यामुळे विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी मैदानात उतरला. गेल्या काही दिवसांत विराटच्या खेळण्याच्या क्रमांकाबाबत काही प्रयोग करण्यात आले होते. त्यामुळे आज तोच तिसऱ्या क्रमांकावर उतरणार की नाही याबाबत शंका होती. पण कर्णधार धोनी आणि संघ व्यवस्थापनाने कोहलीला त्याच्याच म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याचा निर्णय घेतला. कोहलीने पुन्हा एकदा हा निर्णय सार्थ करून दाखवला.
कोहली खेळण्यासाठी मैदानात आला त्यावेळी भारताची स्थिती फारशी चांगली नव्हती मात्र अगदीच खराबही नव्हती. एखा बाजुने शिखर धवन किल्ला लढवत होता. त्यामुळे कोहलीनेही सुरुवातीला अत्यंत संयमाने फलंदाजी केली. त्याने अर्धशतक पूर्ण केले, त्यात तर केवळ एका चौकाराचा समावेश होता. सामन्यात टिकून राहणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव त्याला असल्याचे त्याच्या फलंदाजीवरून सारखे जाणवत होते.
अर्धशतकानंतर मधल्या षटकांमध्ये फारशी जोखीम न घेतला धावफलक धावता ठेवण्यास कोहलीने प्राधान्य दिले. मधल्या काळात धवन धावबाद झाला. त्याच्याबरोबर रोहितने दुसऱ्या वीकेटसाठी 129 धावांची भागीदारी केली. त्यापाठोपाठ आलेल्या रैनाबरोबरही कोहलीने चांगला जम बसवला आणि तिसऱ्या गड्यासाठी त्यांनी 110 धावांची भागीदारी केली.
या दोन्ही भागीदारींच्या जोरावर भारताना 300 धावांचा टप्पा गाठता आला. 35 व्या षटकापासून घेण्यात आलेल्या पॉवर प्लेचा मात्र कोहलीला फायदा करून घेता आला नाही. शतकाच्या जवळ आलेला असल्याने त्याने फारशी जोखीम घेतली नाही. त्यामुळे भारताला 325 चा टप्पा गाठणे शक्य झाले नाही. पण पाकिस्तानविरोधात भारताने विश्वचषकातील सर्व सामने जिंकले असले तरी, भारतीय फलंदाजाला शतक करता आले नसल्याने काहीशी कमी कायम जाणवत होती, ती कोहलीच्या शतकाने पूर्ण केली.
पुढील स्‍लाइडवर पाहा, विराटच्‍या रोमहर्षक छबी...