आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virat Kohli led Team India Arrives In Bangladesh For Asia Cup News In Amrathi,

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत कोहलीच उत्तम पर्याय ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा स्टार कर्णधार महेंद्रसिंग धोनी जखमी असल्यामुळे आगामी आशिया चषकात सहभागी होऊ शकणार नाही. त्याच्या जागी निवड समितीने विराट कोहलीकडे नेतृत्व सोपवले आहे. आकडेवारीकडे लक्ष दिले, तर विदेशी भूमीवर सलगपणे अपयशी ठरत असलेल्या धोनीच्या जागी युवा खेळाडू विराट कोहली उत्तम पर्याय ठरू शकतो.

धोनीला चार पर्याय : दुखापत किंवा इतर वैयक्तिक कारणांमुळे कर्णधारपदापासून ब्रेक घेण्याची ही धोनीची पहिली वेळ नाही. त्याच्या अनुपस्थितीत चार वेगवेगळ्या खेळाडूंनी विदेशात भारताचे नेतृत्व केले. वीरेंद्र सेहवाग, सुरेश रैना यांचे नेतृत्व सरासरी ठरले. मात्र, विराट कोहली आणि गौतम गंभीर यांनी तर धोनीलासुद्धा मागे टाकले. यांच्या रूपाने धोनीला कर्णधारपदासाठी चार पर्याय ठरू शकतात.

नेतृत्व बदलण्याची गरज काय?
दोन वर्षांपासून टीम इंडियाला विदेशात चार सलग पराभवांना सामोरे जावे लागले. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि आता न्यूझीलंडमध्ये आपण सपाटून मार खाल्ला. विदेशी भूमीवर धोनीची रक्षात्मक रणनीती संघाच्या पराभवाचे एक मुख्य कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. टीम इंडियाच्या चाहत्यांच्या मते पुढच्या वर्षी होणार्‍या वनडे वर्ल्डकपपूर्वी धोनीने कर्णधारपद सोडले पाहिजे. कसोटीसह वनडेतही भारतीय संघ विदेशी भूमीवर अपयशी ठरत असेल, तर रणनीती किंवा कर्णधार बदलण्याची गरज आहे काय, असा प्रश्न निर्माण होतो. माजी कर्णधार द्रविडने धोनीच्या रक्षात्मक रणनीतीवर कठोर टीका केली आहे. गांगुलीनेसुद्धा यावर नाराजी व्यक्त केली. न्यूझीलंडचा माजी खेळाडू मार्टिन क्रोने तर थेट कोहली धोनीसाठी उत्तम पर्याय असल्याचे सांगून टाकले. धोनीच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडमध्ये भारताने वनडे मालिका 4-0 ने गमावली. आता आशिया चषकात अब्रू वाचवण्याचे आव्हान टीम इंडियापुढे असेल.

विराट कोहली : 87.50 टक्के विजय
कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा फक्त एका वेळेस पराभव झाला. कर्णधार म्हणून त्याने सर्व सामने विदेशात खेळले. त्याच्या नावे झिम्बाब्वेविरुद्ध क्लीन स्वीपचा विक्रमही जमा आहे. कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडताना फलंदाज म्हणून कोहलीची कामगिरी खालावली नाही. त्याने 8 सामन्यांत 66.40 च्या सरासरीने 332 धावा काढल्या. यात दोन शतके ठोकली. 115 धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली.

कर्णधार बदलाचे वारे
सध्या वेगवेगळ्या स्वरूपांत वेगवेगळे कर्णधार ठेवण्यात येत आहेत. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि आफ्रिकेने विविध कर्णधारांवर विश्वास टाकला आहे. ऑस्ट्रेलियाचा टी-20 कर्णधार जॉर्ज बेली असून कसोटी आणि वनडेची जबाबदारी मायकेल क्लार्ककडे आहे. इंग्लंड संघानेही टी-20 साठी स्टुअर्ट ब्रॉडकडे नेतृत्व सोपवले असून वनडे आणि कसोटीसाठी अ‍ॅलेस्टर कुकवर मदार आहे. आफ्रिकेने टी-20साठी फॉप डू प्लेसिस, वनडेसाठी एल्बी डिव्हिलर्स आणि कसोटीसाठी ग्रॅमी स्मिथकडे नेतृत्व सोपवले आहे. अशा परिस्थितीत धोनीला तणावमुक्त करण्यासाठी एखाद्या स्वरूपाची जबाबदारी कमी केली जाऊ शकते. कसोटी, वनडे आणि टी-20 यापैकी एखाद्या संघाचे नेतृत्व कोहलीकडे दिल्यास उर्वरित स्वरूपांत धोनी तणावमुक्त होऊ अधिक प्रखरपणे कार्य करू शकतो.