आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशातही भरपूर ख्याती...!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी जलतरण स्पर्धेच्या निमित्ताने ब-याच देशांत फिरलो आहे. विदेशातही सचिन तेंडुलकर या नावाला खास ग्लॅमर, वलय आहे. तुम्ही सचिन तेंडुलकरच्या देशाचे काय, असे आम्हाला अनेकांनी विदेशात विचारले. विशेषत: ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेत आमची ओळख तशीच होती.
मी जलतरणपटू असलो तरीही बालपणापासून क्रिकेटचा चाहता आहे. सचिन आणि क्रिकेट असे समीकरण माझ्या बालपणापासून जुळलेले आहे. एखाद्या सामन्यात किंवा एखाद्या मालिकेत सचिन नसला तर क्रिकेट पाहण्याचा मूडच जायचा. माझ्यासोबत तर तसे आजही होते. सचिन म्हणजे भारतीय क्रिकेटचा प्राण, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरू नये. सचिन फक्त भारताचा नव्हे तर जगातला महान खेळाडू आहे. त्याची जगभर ख्याती आहे. मी स्वत: त्याचा अनुभव घेतला आहे. आपल्या देशाबाहेर आपल्याच देशाच्या एखाद्या खेळाडूची ख्याती ऐकायचो त्या वेळी आमच्या अंगावर शहारे यायचे. सचिन भारतीय आहे आणि त्यातल्या त्यात तो महाराष्‍ट्रीयन आहे, याचा मला अधिक अभिमान आहे.
सचिनसारखा खेळाडू पुन्हा होणे नाही. तो आता दोनशेव्या कसोटीनंतर खेळताना दिसणार नाही, यावर भरवसा होत नाही. सचिन आणि क्रिकेट असे गणित जुळले होते. सचिनच्या निवृत्तीमुळे मी अत्यंत दु:खी झालो आहे.
सचिनकडून मी एक गोष्ट शिकलो. तो अत्यंत समर्पित खेळाडू आहे. खेळातील समर्पण मी त्याच्याकडून शिकलो. सचिनवर अनेकांनी कितीतरी वेळा टीका केली. तो डगमगला नाही. सचिन खेळत राहिला. पूर्ण समर्पणाने त्याने कामगिरी केली आणि मैदान गाजवले. सचिनकडून हे गुण मी आत्मसात केले. जलतरणात मीसुद्धा बॅडपॅचमध्ये आलो होतो. माझी कामगिरी अपेक्षेप्रमाणे होत नव्हती. माझ्यावर टीका होऊ लागली. मी खूप आधीच खेळाला सोडले असते. मात्र, सचिनकडून टिकून लढण्याची प्रेरणा मिळाली. टीकेनंतरही मी खेळ सोडला नाही.
सचिनसारखा खेळाडू युगात कधीतरी घडत असतो. सचिनच्या युगात मी जन्म घेतला, त्याला खेळताना पाहू शकलो...यापेक्षा दुसरा मोठा आनंद काय असेल!
त्याचे द्विशतक खासच होते...!
सचिनने वनडेत ठोकलेले द्विशतक मी कधीही विसरू शकणार नाही. एकीकडे काही संघांना दोनशे धावा काढताना नाकी नऊ येत असताना दुसरीकडे एकटा एक खेळाडू दोनशे धावा काढतो ते सुद्धा दक्षिण आफ्रिकेसारख्या दिग्गज संघाविरुद्ध. एखाद्या दुबळ्या संघाविरुद्ध त्याचे द्विशतक नव्हते. त्याच्या द्विशतकाने भल्याभल्यांना तोंडात बोटे टाकण्यास भाग पाडले.
शब्दांकन : विजय साठे